Rohit Pawar | महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते; विद्यापीठ घोटाळ्यावर रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
Tv9 Marathi July 30, 2026 05:45 PM

विद्यापीठातील कथित पदवी घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थी संघटनेने या संदर्भात कुलगुरूंना यापूर्वीच लेखी पत्र दिले होते. विद्यापीठात पैसे घेऊन पदव्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधितांनी धाडसाने हा प्रकार उघडकीस आणला. मात्र, एक महिन्यापूर्वी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही. माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरच विद्यापीठ प्रशासनात खळबळ उडाली आणि संबंधित अधिकारी रमेश मुखेकर यांना निलंबित करण्यात आले.

रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, केवळ एका अधिकाऱ्याला निलंबित करून हे प्रकरण संपणार नाही. आतापर्यंत एकच बनावट पदवी समोर आली असली, तरी अशा अनेक पदव्या दिल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रमेश मुखेकर यांच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी, व्हॉट्सअॅप चॅटची पडताळणी तसेच 2015 पासूनच्या सर्व पदवी वितरण प्रक्रियेचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

याप्रकरणी एफआयआर दाखल झाला असला तरी संपूर्ण रॅकेटचा शोध घेणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले. या प्रकरणात केवळ एका व्यक्तीचा सहभाग नसून त्यामागे मोठे जाळे असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. तक्रार करणारे गायकवाड आणि कदम यांना निनावी फोन येत असल्याचाही दावा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहित पवार यांनी पुढे आरोप केला की, विद्यापीठाशी संबंधित दोन कंपन्यांमध्ये भाजप विचारसरणीशी संबंधित व्यक्तींचा प्रभाव असल्याची चर्चा आहे. राजेश पांडे नावाच्या व्यक्तीचा विद्यापीठातील वावर आणि त्याची भूमिका काय होती, याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, विद्यापीठातील कथित पदवी घोटाळ्याची चौकशी केवळ एका अधिकाऱ्यापुरती मर्यादित न ठेवता, बनावट पदव्या कोणाला देण्यात आल्या, त्यामागे कोणाचे संरक्षण होते आणि संपूर्ण साखळी कशी कार्यरत होती, याचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.