कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी धमकी मिळाल्याचा आरोप त्यांच्या आईने केला. धमकी मिळाल्याने नातेवाईकांच्या घरी राहायला जावं लागल्याचे आईने सांगितलं. दीपकेंना भाजप प्रवेशासाठी धमकी मिळाल्याच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. परंतु दीपकेंना धमकी मिळाल्याचा आरोप भाजप नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. धमकी मिळाली असेल, तर कोणत्या माध्यमातून धमकी मिळाली, याची माहिती द्या, असं चॅलेंज भाजप आमदार राम कदम यांनी दिली.
भाजप आमदार राम कदम यांनी दीपके कुटुंबाला कोणतीही धमकी मिळाली नसल्याचा दावा केला आहे. आमदार राम कदम म्हणाले, ‘दीपके कुटुंबीय भाजपने धमकी दिली, असं म्हणतात. परंतु कुठल्या माध्यमातून धमकी दिली, याची माहिती द्या. आहे का हिंमत? प्रसिद्ध झोतात येण्यासाठी हा प्रयत्न दीपके यांच्याकडून सुरू आहे’.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही दीपके कुटुंबाच्या आरोपावर भाष्य केलं. भाजप नेते उपाध्ये म्हणाले, ‘धादांत खोटं बोलणं… इतर राजकीय पक्षाचे नेते खोटं बोलतात, तसा अभिजित दिपके यांनी आरोप केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तो झाला नाही म्हणून धमक्या यापेक्षा मोठा विनोद नाही, भाजपा संवादावर विश्वास ठेवते. धमक्या देण्याचा प्रश्न येत नाही’.
‘एखाद्या आंदोलनाचा चेहरा झाले म्हणून सगळ्या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. बाबा रामदेव यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. एक आंदोलन यशस्वी झालं म्हणून सर्व विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. काल सभागृहात विधेयक देखील आलं, त्यानुसार दिपके यांनी अभिनंदन केलं पाहिजे होतं, असेही ते म्हणाले.
काय धमकी मिळाली होती?
अभिजीत दीपके यांच्या आईने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, ‘आंदोलन सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी एका व्हिडिओ माध्यमातून धमकी मिळाली होती. त्याने धमकी मिळाल्याची माहिती कुटुंबाला दिली होती. व्हिडिओमध्ये अभिजीत यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगितलं होतं. भाजपमध्ये प्रवेश न केल्यास आई-वडिलांना टार्गेट केलं जाईल, अशी धमकी मिळाली होती.