मुंबई : रेल्वेचं आरक्षित तिकीट (Railway) मिळवणं म्हणजे मोठं जिकरीचं काम, ऐनवेळी हे तिकीट सहसा उपलब्ध होतच नाही. त्यामुळे, या ना त्या मार्गाने, किंवा जुगाड जुळवून रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची धावपळ असते. त्यासाठी, जास्तीचे पैसे देण्याचीही तयारी प्रवासी, नागरिकांची असते. अनेकदा, उद्योगक किंवा महत्त्वाच्या कामानिमित्त काही लोक एजंट लोकांशी संपर्क साधत असे तिकीटही मिळवतात. रेल्वेसाठी व्हीाआयपी, लोकप्रतिनिधी आणि काही सवलतीच्या व्यक्तींसाठी इमर्जन्सी तिकीट राखीत असते. आता, अशाच व्हिआयपी व्यक्तींच्या कोट्यातील रेल्वे तिकीटांची बोगसपणे विक्री करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी (Police) अटक केली आहे. विशेष म्हणजे, या टोळीने चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट लेटरपॅड तयार केल्याचंही समोर आलं आहे.
राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या लोकभवन कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट स्वाक्षऱ्या व शिक्के वापरून रेल्वेच्या व्हीआयपी कोट्यातून तिकीटे मिळवून देणाऱ्या टोळीचा मलबार हिल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून उत्तर प्रदेश, गुजरात आणि मुंबईतून 6 आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून 12 मोबाईल, 1 लॅपटॉप, 16 सिम कार्ड, 70 बँक कार्ड आणि 400 हून अधिक व्यक्तींचा गोपनीय रेल्वे बुकिंग डेटाबेस, बनावट शिक्के व आधार कार्डे जप्त केली आहेत. याप्रकरणी, मुख्य आरोपी अमरीश ठक्कर याच्याविरुद्ध यापूर्वीही कुर्ला आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांत अशाच प्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पुढील तपास मलबार हिल पोलीस करत आहे
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावरील रेल्वे कॅन्टीनच्या स्वच्छता,अन्न सुरक्षा आणि आरोग्याबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण होत आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 2 वरील रेल्वे कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या भेळसाठी वापरण्यात येणारा टोमॅटो उंदराकडून कुडतडण्यात येत असल्याचे दृश्य मोबाईल कॅमेरात कैद झाले आहे. सद्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या दृश्यांमुळे रेल्वे फलाटावरील स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि आरोग्य विषयी गंभीर काळजी व्यक्त होत आहे.
मुंबईतील एका गुन्ह्यात गेल्या 15 वर्षांपासून फरार असलेला आरोपी साकीनाका पोलिसांच्या ताब्यात आहे. 2010 मधील सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला व दंगल प्रकरणातील आरोपीला विरारमधून अटक करण्यात आली. अयुब मोहम्मद सफात चौधरी (वय 38) याच्याविरोधात स्टँडिंग अजामीनपात्र वॉरंट जारी होते, गोपनीय माहितीच्या आधारे साकीनाका पोलिसांच्या तडीपार पथकाने शिताफीची कारवाई करत विरार (पश्चिम) येथून आरोपीला जेरबंद करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाकडून आरोपीला न्यायालयीन कोठडी पाठवण्यात आले आहे.