Pune Cleanliness Contest: पुणे महापालिकेचा स्वच्छता सप्ताह: तीन क्षेत्रीय कार्यालयांना ९० लाखांचे पारितोषिक, त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन
esakal July 30, 2026 11:45 PM

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या तीन क्षेत्रीय कार्यालयांना एकूण ९० लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या प्रस्तावास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या स्पर्धेचे त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यांकन केले जाणार आहे, अशी महिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार २२ ते २८ जुलैदरम्यान स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिर परिसरातून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला होता. त्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत विविध स्वच्छता उपक्रम सुरू ठेवण्यात आले आहेत. या मोहिमेत शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग आहे. या स्पर्धेसाठी सार्वजनिक रस्ते, बसस्थानके, शाळांमधील स्वच्छता, बाजारपेठा, नदी-नाले, झोपडपट्ट्या आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता अशा १० निकषांवर मूल्यांकन केले जाणार आहे.

प्रत्येक निकषासाठी १० गुण याप्रमाणे एकूण १०० गुणांचे मूल्यांकन होईल. यामध्ये प्रथम क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयाला ५० लाख, द्वितीय क्रमांकाला २५ लाख आणि तृतीय क्रमांकाला १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. यासाठीचा ९० लाख रुपयांचा खर्च सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील 'सॅनिटेशन कमिटी व जनजागृती मोहीम' या अर्थशीर्षकातून केला जाणार आहे. या विभागाकडे १३ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

याचे होणार मूल्यांकन

- रस्ते, बसस्थानके व रेल्वेस्थानक परिसर स्वच्छता

- शाळांमधील स्वच्छता मोहीम व जनजागृती

- मंडई, बाजारपेठा व शासकीय इमारतींची स्वच्छता

- जलस्रोत, झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमधील स्वच्छता

- ई-कचरा संकलन, शौचालय देखभाल व नावीन्यपूर्ण उपक्रम

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.