Medical Emergency: एक किलोपेक्षा अधिक मॅग्नेट गिळलेल्या १० वर्षीय मुलाचा जीव वाचला; विरार-मिरा रोड येथील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया
esakal July 30, 2026 11:45 PM

विरार : पोटदुखी आणि सतत उलट्या होत असल्याने १० वर्षीय एका मुलाला (मास्टर रोहित, नाव बदललेले) वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे दाखल करण्यात आले. सुरुवातीला ही साधी पोटदुखी वाटत होती. मात्र तपासणीत मुलाने खेळताना अनेक लहान चुंबकीय धातूचे तुकडे (मॅग्नेट) गिळल्याचे समोर आले. ही स्थिती काही तासांत जीवघेणी ठरू शकली असती. यावर तातडीने उपचार करून मुलाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

हा मुलगा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) ने ग्रस्त आहे. अशा मुलांमध्ये अनेकदा अन्न नसलेल्या वस्तू तोंडात टाकण्याची सवय आढळते. एकापेक्षा जास्त मॅग्नेट गिळल्यास ते आतड्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये एकमेकांना चिकटतात. त्यामुळे आतडे अडकणे, आतड्याला छिद्र पडणे, संसर्ग होणे आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे डॉ. बादशाह खान, बालरोगतज्ज्ञ यांनी मुलाची तपासणी केली. लक्षणांवरून त्यांनी तातडीने आतड्यात अडथळा असल्याचा संशय व्यक्त केला आणि मुलाला त्वरित दाखल केले. एक्स-रेमध्ये पोटात धातूच्या वस्तू दिसल्या, तर सीटी स्कॅनमध्ये त्या लहान आतड्यात अडकलेल्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉ. बिनल शाह यांनी कोलोनोस्कोपी केली. मात्र मॅग्नेट मोठ्या आतड्यात पोहोचले नव्हते.

यानंतर वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील डॉ. भावेश दोशी आणि डॉ. प्रदीप शेनॉय यांनी तातडीची शस्त्रक्रिया करून लहान आतड्यात अडकलेले सर्व मॅग्नेट सुरक्षितपणे बाहेर काढले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे आतड्याला छिद्र पडण्यापासून आणि कायमस्वरूपी नुकसान होण्यापासून मुलाची सुटका झाली. शस्त्रक्रियेनंतर मुलाची प्रकृती चांगली राहिली आणि आठवडाभरानंतर त्याला घरी सोडण्यात आले.

डॉ. बादशाह खान म्हणाले, "अनेक पालकांना वाटते की मुलाने एखादी छोटी वस्तू गिळली तर ती आपोआप बाहेर पडेल. मात्र मॅग्नेटच्या बाबतीत हे अत्यंत धोकादायक आहे. दोन लहान मॅग्नेटसुद्धा आतड्याच्या भिंतीतून एकमेकांना चिकटू शकतात. त्यामुळे रक्तपुरवठा बंद होऊन आतड्याला छिद्र पडू शकते आणि गंभीर संसर्ग होऊ शकतो. विशेषतः ऑटिझम असलेल्या मुलांच्या पालकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे."

डॉ. भावेश दोशी म्हणाले, "एकापेक्षा जास्त मॅग्नेट गिळणे ही मुलांमधील सर्वात धोकादायक आपत्कालीन परिस्थितींपैकी एक आहे. योग्य वेळी तपासणी आणि शस्त्रक्रिया झाल्यामुळे आम्ही मुलाचा जीव वाचवू शकलो. मॅग्नेट किंवा बटण बॅटरी गिळल्याचा संशय जरी आला तरी वेळ न दवडता त्वरित रुग्णालयात जावे."

वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील तज्ज्ञांनी पालकांना आवाहन केले आहे की, मॅग्नेट असलेली खेळणी, मॅग्नेटिक बीड्स, बटण बॅटऱ्या, नाणी आणि इतर लहान धातूच्या वस्तू मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवाव्यात. मुलाने अशा वस्तू गिळल्याचा संशय आल्यास उलटी करण्याचा प्रयत्न करू नये. त्वरित डॉक्टरांकडे गेल्यास गंभीर गुंतागुंत आणि मोठी शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.