पुणे : देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शनिवारी (ता. १) पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या प्रवासात खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहा यांचा ताफा ज्या मार्गाने जाणार आहे, तेथील रस्ते खड्डेमुक्त व एकदम चकाचक करा असे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
टिळक स्मारक न्यासातर्फे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यानिमित्त हे दोन्ही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्य नेते पुण्यात येणार आहेत. अमित शहा यांच्या या दौऱ्यास काँग्रेसकडून विरोध केला जाणार आहे तर भाजपनेही जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेले असताना पोलिस व सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत.
एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे शहराच्या सर्वच भागातील रस्त्यांना खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पॅचवर्कमुळे रस्ते समान पातळीमध्ये नाहीत. वाहनचालकांच्या पाठिला जोरदार हदरे बसत आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त नवल किशोर राम यांनी आज (ता. ३०) महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये विमानतळापासून ते महर्षीनगर पर्यंत ज्या मार्गाने अमित शहा यांचा ताफा जाणार आहे, ते सर्व रस्ते खड्डेमुक्त आणि पॅचमुक्त करा. त्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हे रस्ते स्वच्छ, अतिक्रमणमुक्त ठेवण्यासही सांगितले आहे.
दरम्यान, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. याच दिवशी शहा पुण्यात असल्याने ते सारसबाग परिसरातील आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भागातील सुरक्षा व सारसबाग परिसरात होणारी गर्दी याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही. पण दौरा निश्चित झाल्यास ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी सारसबाग स्वारगेट, व्होल्गा चौक येथील रस्ते चांगले करण्याच्या सूचना दिल्या आहेत.