सोलापूर शहर क्राईम ब्रॅंचची कारवाई! शहरातील साऊंड व्यावसायिक तरूणाकडे सापडले ६.८० लाखांचे मेफेड्रॉन; जुना पूना नाका परिसरात शहर गुन्हे शाखेची कारवाई, वाचा...
esakal July 31, 2026 03:45 AM

सोलापूर : सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जुना पूना नाका परिसरात धाड टाकून एका तरुणाकडील ३४ ग्रॅम ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. रूपेश प्रदिप थडसरे (रा. मित्र नगर, शेळगी, सोलापूर) असे त्या संशयिताचे नाव आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थाची बाजारभावानुसार किंमत सुमारे ६ लाख ८० हजार रुपये आहे.

सोलापूर शहरात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर शहर पाेलिसांचा नेहमीच वॉच राहिला आहे. शहर गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळील (जुना पूना नाका परिसर) ब्रिजखाली एक तरुण संशयास्पदरित्या थांबला होता. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पथकाने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत एका प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर आढळली. तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपासणी केली. त्यावेळी ती पावडर ‘मेफेड्रॉन’ (एम.डी.) असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी रूपेश थडसरे याला पोलिसांनी अटक केली.

चौकशीदरम्यान, त्याने हा अंमली पदार्थ सोलापूर शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलिस उपनिरीक्षक मनोज मोरे, विजय बनसुडे यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडली.

संशयितालाच होते ‘एमडी’चे व्यसन

सोलापूर शहरातील रूपेश थडसरे हा साऊंड व्यावसायिक आहे. त्याचा विवाह झाला असून दोन मुली आहेत. त्याला मित्राच्या नादाने ‘एम.डी.’ सेवन करण्याचे व्यसन लागले. त्यानंतर तो मित्राच्याच मदतीने ‘एम.डी.’ मागवत होता, अशी माहिती समोर आली आहे. रूपेशला न्यायालयाने २ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याने कोणाकडून ‘एम.डी.’ आणले, यात कोण कोण सहभागी आहे, याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय बनसुडे करीत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.