बीड : बीड जिल्ह्याच्या नवनिर्वाचित पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांनी बीडमध्ये दाखल होताच रात्रीआठच्या सुमारास जिल्हा प्रशासनाची आक्रमक आढावा बैठक घेतली. बीड-परळी रेल्वेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १७ सप्टेंबरपासून पुढील टप्प्यातील रेल्वे सेवा सुरू झालीच पाहिजे असे थेट आणि कडक निर्देश त्यांनी या वेळी प्रशासनाला दिले.
या बैठकीत बीड-परळी रेल्वे मार्गावरून खासदार बजरंग सोनवणे आक्रमक दिसले. १७ सप्टेंबरपूर्वी रेल्वे सुरू करण्याचा दिलेला शब्द प्रशासनाने पाळावा. तसेच दक्षिण आणि मध्य रेल्वेच्या समन्वयात काही अडचणी असल्यास मला सांगा, मी केंद्रस्तरावर प्रश्न सोडवतो असे त्यांनी ठामपणे सांगितले. तर भूसंपादनातील अडचणींवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करून पुढाकार घ्यावा, असे आमदार धनंजय मुंडे यांनी सुचवले. बैठकीत आमदार धनंजय मुंडे यांनी परळी बायपास रस्त्यावरून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पुलाचे काम सुरू नसतानाही बायपास चार महिने बंद का ठेवला? तो रस्ता आधी तातडीने सुरू करा, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यावर पुन्हा बंद करा असा सज्जड दम त्यांनी दिला. या वेळी मनरेगा अंतर्गत झालेल्या कामांबाबत उपस्थित लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शासनाच्या एक एकर जागेत ऑटिझम पार्क उभारण्याची मागणी आमदार मुंडे यांनी केली. त्याला तत्काळ प्रतिसाद देत उद्याच याबाबतचा शासकीय ठराव घेतला जाईल अशी घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली.
या महत्त्वपूर्ण बैठकीला खा.बजरंग सोनवणे, आ.धनंजय मुंडे, आ.प्रकाश सोळंके, आ.विक्रम काळे, आ.विजयसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, सीईओ जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महावितरणचा गलथान कारभार; पालकमंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक अन् बीड अंधारात
बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याच्या रेल्वे प्रश्नावर पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रशासनाची रात्री उशिरा आढावा बैठक घेत होत्या. सर्व वरिष्ठ अधिकारी हजर असतानाच अचानक संपूर्ण बीड शहराचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या या बेजबाबदार आणि अनागोंदी कारभाराने खुद्द पालकमंत्र्यांच्या बैठकीतच अंधार पसरवला. सर्वसामान्यांना रोज वीज खंडित होण्याचा मनस्ताप सहन करावा लागत असताना, आता थेट उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतच विजेचा खेळखंडोबा करून महावितरणने आपल्या सुस्त व भोंगळ कारभाराचा कळस दाखवून दिला आहे. जिल्ह्याच्या मुख्य बैठकीतच जर ही अवस्था असेल, तर सामान्य जनतेचे महावितरण काय हाल करत असेल? असा संतप्त सवाल या घटनेनंतर बीडकर उपस्थित करत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार्किंगमधील वाहनांवर झाड कोसळले
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची रात्री उशिरा आढावा बैठक सुरू होती. याच दरम्यान कार्यालय परिसरातील पार्किंगमध्ये अचानक एक विशाल झाड उभ्या वाहनांवर कोसळले. या अपघातात तेथील वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, झाड कोसळले त्या वेळी वाहनांजवळ कुणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या अचानक घडलेल्या घटनेने परिसरात काही काळ मोठा गोंधळ उडाला होता.