कार्तिक आर्यनच्या गुडघ्याला शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच शस्त्रक्रिया होण्याची शक्यता
Marathi August 19, 2026 02:24 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या दिग्दर्शक कबीर खान यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, शूटिंगदरम्यान कार्तिकच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दुखापतीनंतर त्याला तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन कबीर खान यांच्या आगामी चित्रपटातील एका महत्त्वाच्या ॲक्शन सीनचे शूटिंग करत होता. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. शूटिंगच्या शेवटच्या दोन दिवसांत मोठ्या ॲक्शन सीन्सचे चित्रीकरण सुरू होते. याचदरम्यान कार्तिकच्या गुडघ्याला दुखापत झाली.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटासाठी कार्तिक ॲक्शन कोचसोबत विशेष प्रशिक्षण घेत होता. कठीण ॲक्शन सीन्ससाठी तो मोठी तयारी करत होता. मात्र, हे सीन्स पूर्ण करण्यापूर्वीच त्याला दुखापत झाल्याने शूटिंग थांबवावे लागले. कार्तिकच्या गुडघ्याला शूटिंगदरम्यान दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘शहजादा’ चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यानही त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते.

दुखापतीनंतर कार्तिक आर्यनला उपचारासाठी फोर्टिस रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रोडक्शनशी संबंधित माहितीनुसार, कार्तिकच्या गुडघ्यावर लवकरच शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कार्तिकला काही दिवस विश्रांती घ्यावी लागू शकते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तो पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

कार्तिक पूर्णपणे बरा झाल्यानंतर दिग्दर्शक अनुराग बसू यांच्या आगामी चित्रपटावर काम सुरू करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागू शकते. याशिवाय तो ‘नागझिला’ या चित्रपटातही काम करत आहे.

सध्या कार्तिकच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या विश्रांतीनंतर तो पुन्हा शूटिंगवर कधी परतणार, याकडे त्याचे चाहते आणि चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.