मुख्यमंत्र्यांना करावा लागला हस्तक्षेप
वृत्तसंस्था/ काकीनाडा
आंध्रप्रदेशच्या काकीनाडा शहरातील एका नर्सिंग कॉलेजमध्ये राज्याच्या तसेच ईशान्येतील विद्यार्थिनींदरम्यान मोठा वाद झाला, या वादादरम्यान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाच हस्तक्षेप करावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित भांडण सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. काकीनाकडा येथील एस.के. कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये मूळच्या आंध्रच्या विद्यार्थिनी आणि ईशान्येतील विद्यार्थिनींदरम्यान झटापट झाली, ज्यात एक विद्यार्थिनी जखमी झाली.
मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेची समीक्षा करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याचा निर्देश दिला आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करत स्थिती बिघडण्यापासून रोखली आहे. ईशान्येतील विद्यार्थिंनीनी प्रशासनाच्या कारवाईवर समाधान व्यक्त केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले.
एका विद्यार्थिनीचा मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार वसतिगृहातील ईशान्येशी संबंधित विद्यार्थिनींनी पोलिसांकडे केली होती. यामुळे वसतिगृहात तणाव निर्माण झाला. आंध्रचे रहिवासी असलेल्या विद्यार्थिंनीना तक्रारीची माहिती कळताच दोन्ही समुहांदरम्यान झटापट झाली. यादरम्यान एका विद्यार्थिनीच्या डोक्याला ईजा झाली, तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.