सोनाक्षीच्या ट्रोलिंगसाठी BJP आयटी सेल जबाबदार, शत्रुघ्न सिन्हा यांचा गंभीर आरोप
Marathi August 19, 2026 03:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बाॅलिवूड कलाकारांना ट्रोलिंग हे नवीन नाही. परंतु अलीकडे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या सोशल मीडिया ट्रोलिंगवरून, ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. सोनाक्षीला ट्रोल करण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलचा हात असल्याचा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला. सोनाक्षीविरोधातील ट्रोलिंग हे नैसर्गिक नसून काही लोकांना पैसे देऊन तिच्याविरोधात ट्रोलिंग करण्यास सांगितले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला सोनाक्षीने पाठिंबा दिल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर टीका होऊ लागली होती. काही जणांनी तिच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले, तर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाच्या वेळी तिने मौन बाळगल्याचा आरोप करतही तिच्यावर निशाणा साधण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सोनाक्षीच्या वडिलांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी सोनाक्षीचे समर्थन करत तिची राजकीय मते आपल्यापेक्षा ठाम असल्याचे म्हटले.

लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार सोनाक्षीच्या ट्रोलिंगबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी दावा केला की, “तिच्या ट्रोलिंगसाठी भाजपा आयटी सेल जबाबदार आहे.” सोनाक्षीविरोधात ट्रोलिंग करण्यासाठी काही लोकांना पैसे दिले जातात. हे ट्रोलर्स विरोध करतात, गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यांना नेमके काय बोलायचे आहे, याचीही अनेकदा कल्पना नसते, असा आरोप त्यांनी केला. “हे ऑर्गेनिक ट्रोलिंग नाही, तर पैसे देऊन आणलेले ट्रोल आहेत,” असा दावा शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. मात्र, अशा ट्रोलिंगकडे आपण लक्ष देत नसल्याचे सांगत त्यांनी सोनाक्षीच्या भूमिकेचेही समर्थन केले.

याच मुलाखतीच्या माध्यमातून शत्रुघ्न सिन्हा यांना भविष्यात सोनाक्षी राजकारणात प्रवेश करणार का, असा प्रश्नही विचारण्यात आला. त्यावर मात्र त्यांनी स्पष्टपणे उत्तर देणे टाळले. सोनाक्षी ही अत्यंत कर्तृत्ववान वडिलांची अत्यंत कर्तृत्ववान मुलगी असल्याचे सांगत, तिच्या राजकारणातील प्रवेशाबाबतचा निर्णय ती स्वतः घेईल, असे त्यांनी सूचित केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.