मुंबईच्या पर्यटकाचा खारघरच्या पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू
Marathi August 19, 2026 10:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

खारघर येथील पांडवकडा धबधब्यात बुडून मुंबईतील एका किशोरवयीन मुलाचा मृत्यू झाला. प्रणव मिश्रा (16) असे मयत मुलाचे नाव असून तो मुंबईतील कुर्ला येथील रहिवासी होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी शोध मोहीम राबवत प्रणवचा मृतदेह बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, खारघर येथील पांडवकडा धबधबा येथे एक जण बुडाल्याची माहिती अग्नीशमन दलाला बुधवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास मिळाली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाण्यात उतरून शोध मोहीम सुरु केली. या मोहिमेदरम्यान एका दगडाखाली दहा ते बारा फूट खोलवर प्रणवचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बाहेर काढत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आला.

घटनास्थळी खारघर पोलीस, अग्निशमन दल, फायरमन, यंत्रचालक उपस्थित होते. दरम्यान या परिसरात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.