‘न्यूटन’ फेम मराठमोळ्या अभिनेत्रीचा मोठा धमाका! निर्माती बनून केली फिल्म; आता थेट बुसानमध्ये गाजणार ‘सेल्वी’
abp majha web team August 24, 2026 07:43 PM

चेन्नई, इंडिया / बुसान, साऊथ कोरिया: तमिळ लेखक-दिग्दर्शक सैलेश रत्नकुमारच्या दिग्दर्शनातील डेब्यू फीचर फिल्म ‘सेल्वी’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यूटन आणि कालामधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी आणि नॅशनल फिल्म अवॉर्ड विजेती अंजली पाटील या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून तिनेच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. 31व्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या व्हिजन एशिया सेक्शनमध्ये ‘सेल्वी’चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. हा प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल 6 ते 15 ऑक्टोबर 2026 दरम्यान पार पडणार आहे.

होम-केअर वर्कर्सच्या मोठ्या प्रमाणात नजरेआड राहिलेल्या जगात घडणारी ‘सेल्वी’ ही काळजी, स्थलांतर, मैत्री, अपराधीपणा, थकवा आणि कितीही संकटं आली तरी पुढे चालत राहण्याच्या जिद्दीची गोष्ट आहे.

काय आहे कथानक?

या चित्रपटाची कथा सैलेशने सिनेमॅटोग्राफर भार्गव श्रीधर यांच्यासोबत लिहिली आहे. भार्गव यांच्या आईच्या गंभीर आजारपणात अनेक महिने त्यांची काळजी घेणाऱ्या होम-केअर नर्सेसना जवळून पाहत या कथेचा जन्म झाला. तमिळनाडूतील छोट्या शहरांतून आलेल्या या स्थलांतरित महिला साध्या हॉस्टेलमध्ये राहतात आणि रोज अशा घरांमध्ये काम करतात, जी त्यांच्या स्वतःच्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळी असतात. स्वतः कोयंबतूरहून चेन्नईला स्थलांतरित झालेल्या सैलेशला या जगातील ताणतणाव आणि वास्तव लगेच जाणवलं. सैलेश म्हणतो, “‘सेल्वी’ ही एका महिलेच्या आयुष्यातील अगदी साध्या दिवसाची गोष्ट आहे. मला हा चित्रपट तिच्यासोबत चालावा असं वाटलं. तिच्या आयुष्याच्या अगदी जवळ राहावं, पण तिचं आयुष्य समजावून सांगण्याचा किंवा त्याला आहे त्यापेक्षा जास्त अर्थ देण्याचा प्रयत्न करू नये.”

व्हिजन एशिया हा बुसानचा नव्या एशियन दिग्दर्शकांसाठीचा खास प्लॅटफॉर्म असून, वर्ल्ड सिनेमातील नव्या टॅलेंट्सना शोधण्यासाठी सर्वाधिक लक्ष ठेवल्या जाणाऱ्या सेक्शन्सपैकी एक मानला जातो.चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आणि निर्माती अंजली पाटीलने तिच्या अनाहत फिल्म्स या बॅनरखाली ‘सेल्वी’ची निर्मिती केली आहे. 2021 मध्ये अंजलीने स्थापन केलेली अनाहत फिल्म्स भारतीय आणि जागतिक प्रेक्षकांसाठी अर्थपूर्ण, दमदार आणि विविध विषयांवरील कथा सादर करण्यासाठी ओळखली जाते. फिक्शन आणि नॉन-फिक्शन अशा दोन्ही फॉरमॅट्समध्ये बॅनरने विविध प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे. त्यामध्ये ‘द मूगाई’, ज्याचे सनडान्स 2023 मध्ये प्रदर्शन झाले होते आणि ‘बक्शो बॉन्डी’, ज्याला बर्लिनाले 2025 मध्ये स्थान मिळाले होते, यांचा समावेश आहे. ‘सेल्वी’ हा अनाहत फिल्म्सचा पहिला फुल-लेंथ तमिळ फीचर फिल्म आहे.

मराठमोळ्या अंजलीचा सिनेमा  बुसानमध्ये गाजणार

अंजली म्हणते, “एक अभिनेत्री आणि निर्माती म्हणून ‘सेल्वी’ माझ्यासाठी अशा कथांमधून क्रिएटिव्ह इंडिपेंडन्स पुन्हा मिळवण्याचा मार्ग ठरला, ज्या सांगण्यासाठी संयमाची गरज असते. हेल्थकेअर क्षेत्रातील त्या सामान्य लोकांकडे पाहण्याचा हा एक अतिशय वैयक्तिक आणि जवळचा दृष्टिकोन आहे, जे आयुष्यभर इतरांची काळजी घेत राहतात, पण त्याच वेळी त्यांचं स्वतःचं आयुष्य शांतपणे कोमेजत जातं. बुसानमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर होणं हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा मोठा टप्पा आहे. ‘सेल्वी’ला आम्ही पुन्हा तिच्या घरी, त्या लोकांकडे घेऊन जाणार आहोत, ज्यांची ही कथा खरं तर आहे.”

इंडस्ट्रीतील दिग्गज टेक्निकल टीमची साथ लाभलेल्या या चित्रपटाचे एडिटिंग नऊ नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंकणारे ए. श्रीकर प्रसाद यांनी केले आहे. तर ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट वन’साठी नॅशनल अवॉर्ड मिळवणारे आनंद कृष्णमूर्ती यांनी चित्रपटाचे साऊंड डिझाईन केले आहे.‘सेल्वी’ची को-प्रोड्यूसर म्हणून रेड सी फंड, जो रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा एक उपक्रम आहे, यांची साथ लाभली आहे. चित्रपटाला हॉन्ग कॉन्ग एशिया फिल्म फायनान्सिंगचेही सपोर्ट मिळाले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.