महिनाभरात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; मासवन आश्रमशाळेत एकाचा संशयास्पद अंत, 20 ते 25 विद्यार्थी तापाने फणफणले
संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर August 24, 2026 09:13 PM

Palghar Ashramshala Student Death : पालघर जिल्ह्यातील मासवन येथील आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतून (Maswan Ashramshala) एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. या आश्रमशाळेत इयत्ता पहिलीमध्ये शिकणाऱ्या श्रीयांश शैलेश आंबात या निष्पाप विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. श्रीयांशला गेल्या काही दिवसांपासून तीव्र ताप येत असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, अवघ्या एका महिन्यात याच आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि तेथील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Ashramshala Student Health Issues : पहाटे थंड पाण्याने आंघोळ, उपचारात हलगर्जीपणा

आश्रमशाळेतील प्रशासनाविरोधात पालकांनी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत. लहान मुलांना पहाटे चार ते साडेचारच्या सुमारास गोठवणाऱ्या थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे पालकांनी सांगितले. तसेच, विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांना वेळेवर स्थानिक शासकीय रुग्णालयात नेले जात नाही किंवा पालकांना कळवून घरीही पाठवले जात नाही.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जवळपास 25 ते 30 विद्यार्थी तापाने आजारी असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे, 20 ते 25 विद्यार्थी तापाने फणफणले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याचे शाळा प्रशासनाने मान्य केले आहे.

Palghar Tribal Department Action : प्रशासकीय चौकशीची जोरदार मागणी

एकाच आश्रमशाळेत मोठ्या संख्येने मुले आजारी पडणे आणि महिनाभरात दोन चिमुकल्यांचा जीव जाणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Palghar Ashramshala Incident : विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय?

आश्रमशाळेत मूलभूत आरोग्य सुविधा आणि गरम पाण्याची सोय आहे का?

आजारी पडल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्य वैद्यकीय मदत का मिळाली नाही?

या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत विद्यार्थ्याच्या पालकांनी व ग्रामस्थांनी केली आहे.

ही बातमी वाचा;

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.