Parag Milk Foods Gowardhan Ghee : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) पराग मिल्क फूड्स लिमिटेड (Parag Milk Foods Limited) आणि पतंजलीसह चार ब्रँड्सच्या विरोधात 7 ऑगस्ट 2026 रोजी कलम 55 अन्वये जारी केलेले सर्व निर्देश अखेर मागे घेतले आहेत. FSSAI कडून मिळालेल्या माहितीनुसार पतंजली तूप, गोवर्धन तूप कंपनीच्या आवारातून तपासणीसाठी घेतलेल्या अन्न नमुन्यांच्या प्राथमिक प्रयोगशाळा अहवालात सर्व नमुने निश्चित मानकांनुसार योग्य (Standard Complaint) आढळले आहेत.
FSSAI च्या इंदूर शाखेच्या केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून 18 ऑगस्ट 2026 रोजी एका पत्राद्वारे ही महत्त्वाची माहिती देण्यात आली असून सदर पत्र पराग मिल्क फूड्स लिमिटेड (इंदूर) आणि संबंधित नामनिर्देशित व्यक्तीला पाठवण्यात आले आहे.
FSSAI च्या अधिकृत प्रयोगशाळांमध्ये पतंजली तूप, अमूल तूप, श्रीधी तूप आणि गोवर्धन तूप यांसारख्या प्रमुख ब्रँड्सच्या तुपाची गुणवत्ता चाचणी पूर्ण झाली असून, हे ब्रँड्स मानकांवर खरे उतरले आहेत. तर दुसरीकडे काही अमानक नमुन्यांवर आणि अस्वच्छता आढळलेल्या डेअरींवर FSSAI कडून परवाना निलंबनाची कठोर कारवाई देखील केली जात आहे.
FSSAI च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑगस्ट 2026 रोजी कंपनीच्या अधिकृत आणि सध्याच्या आवाराची प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करण्यात आली होती. या तपासणीदरम्यान विश्लेषणासाठी एकूण 20 नमुने घेण्यात आले होते.
या तपासणीचा अहवाल FOSCOS (Food Safety Compliance System) प्रणालीद्वारे जनरेट करून कंपनीला उपलब्ध करून देण्यात आला होता. या प्राथमिक अहवालाच्या आधारे 7 ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 च्या कलम 55 अंतर्गत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश जारी करण्यात आले होते.
FSSAI ला 17 आणि 18 ऑगस्ट 2026 रोजी नामनिर्देशित अधिकाऱ्यांमार्फत नमुन्यांचा प्राथमिक प्रयोगशाळा विश्लेषण अहवाल प्राप्त झाला. या अधिकृत अहवालामध्ये घेण्यात आलेले सर्व नमुने सुरक्षा आणि गुणवत्तेच्या सर्व मानकांनुसार तंतोतंत योग्य असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर FSSAI ने पूर्वीची सर्व कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.