मोठी बातमी! गव्हाच्या निर्यातीबाबत सरकारनं घेतला मोठा निर्णय, शेतकऱ्यांना फायदा मिळणार का? 
गणेश लटके August 24, 2026 10:43 PM

Wheat Export News :  गव्हाच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवली आहे. त्यामुळं आता भारतातून गव्हाची निर्यात आता पुन्हा सुरु होणार आहे. आता भाराताचा गहू इतर देशांमध्ये निर्यात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे? याबाबतची माहिती पाहुयात.

भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांना फायदा मिळणार

भारत सरकारने आता गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकांचा गहू उत्पादक देश आहे. सरकारने काही वर्षांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. परकीय व्यापार महासंचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. सरकारने आता गहू, पीठ आणि इतर उत्पादनांच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे. यापूर्वी, या वर्षी फेब्रुवारीमध्ये सरकारने गव्हाच्या मर्यादित खेपांना परवानगी दिली होती. दरम्यान, गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवल्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर याचा फायदा भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांनाही होईल असे सांगण्यात आले आहे. 

जागतिक गव्हाचा पुरवठा वाढणार

सोमवारी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेमुळे जागतिक गव्हाचा पुरवठा वाढू शकतो. शिवाय, गव्हासाठी इतर देशांवर अवलंबून असलेल्या देशांनाही यामुळे दिलासा मिळू शकतो. गहू उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. देशातील गेल्या गव्हाच्या पिकाने 120.6 दशलक्ष टनांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.

सरकारनं का घातली होती निर्यातीवर बंदी?

भारतात गव्हाचे उत्पादन नेहमीच चांगले राहिले आहे. असे असूनही, सरकारने 2022 पासून मोठ्या प्रमाणावरील गहू निर्यातीवर बंदी घातली होती. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. यानंतर, देशात गव्हाची पुरेशी उपलब्धता आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. आता सरकारने पुन्हा एकदा निर्यातीला परवानगी दिल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाची मागणी आणखी वाढेल. याचा फायदा भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांनाही होईल.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

 रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सध्या सुरू आहे, ज्यामुळे काळ्या समुद्रातून होणाऱ्या गहू आणि इतर धान्यांच्या पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. काळा समुद्र हा जगातील प्रमुख गहू निर्यात क्षेत्रांपैकी एक आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावरही होत आहे. अशा वेळी, भारतातून वाढलेली गहू निर्यात आशिया, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील गव्हाच्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना मदत करू शकते. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय अनेक देशांना दिलासा देईल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.