जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा August 24, 2026 10:43 PM

जळगाव : श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने आज अनेक ठिकाणी कावड यात्रा आणि शिव मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत आहे. जळगाव-ममुराबाद (Jalgaon) रस्त्यावर प्रजापती नगरजवळही अशीच कावड यात्रा सुरू असताना भरधाव ट्रकच्या धडकेत (Accident) आठ वर्षाच्या मुलाला मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. कावड यात्रेदरम्यान ममुराबाद रस्त्यावर देवीच्या मंदिरामधून दर्शन घेऊन बाहेर येणाऱ्या 8 वर्षीय मुलाला ट्रकने चिरडल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांनी चालकाला बेदम चोप दिला असून संतप्त जमावाने ट्रक पेटवल्याची घटनाघडली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. 

श्रावण मासानिमित्ताने कावड यात्रेचा उत्साह सुरू असतानाच दोन ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. वर्धा येथी पुलगाव येथे कावड यात्रेत मोठी दुर्घटना घडली. कावडचा ढाचा पडल्याने एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची मन हेलावणारी घटना घडली. अधिराज रवी पाटील असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. पुलगांवच्या राम मंदिराजवळ ही घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, जळगावमध्येही ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमावावा लागला. 

जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद रस्त्यावर प्रजापती नगराजवळ भरधाव ट्रकने आठ वर्षीय मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. कावड यात्रेदरम्यान देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडताना या चिमुकल्याला ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अपघातात ट्रक चालकही जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, संतप्त जमावाने रस्त्यावर मृत बालकाचा मृतदेह ठेवत ट्रक चालकाला तात्काळ घटनास्थळी आणून जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. तसेच, पेटलेला ट्रक विझविण्यासही जमावाकडून विरोध केला जात आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांकडून जमावाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.