आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ, कोणत्या विभागात किती? सविस्तर आकडेवारी समोर 
निलेश बुधावले, एबीपी माझा August 24, 2026 09:43 PM

Maharashtra Farmers Loan waiver News :  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या (Punyashlok Ahilyadevi Holkar Farm Loan Waiver Yojana) दुसऱ्या टप्प्यातील हप्ता जारी करण्यात आला आहे. 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत राज्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा (Farmers Loan waiver) लाभ मिळा आहे? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? तर राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आत्तापर्यंत राज्यातील 12 लाख शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. 

केवायसी पूर्ण झालेल्या 1 लाख शेतकऱ्यांनांही लवकरच लाभ मिळणार

राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 17 लाख शेतकऱ्यांपैकी केवायसी पूर्ण करणारे 13 लाख शेतकरी होते. पैकी आत्तापर्यंत 12 लाख शेतकरी यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. केवायसी पूर्ण झालेल्या तरी ही कर्जमाफी न झालेल्या 1 लाख शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. शिवाय उर्वरित 4 लाख शेतकऱ्यांनी  लवकरात लवकर केवायसी केल्यास त्यांना ही कर्जमाफी मिळू शकणार आहे, असे बाबासाहेब पाटील म्हणाले. 

आतापर्यंत 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना एकूण 10 हजार 115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 6 लाख 36 हजार 36 पात्र शेतकऱ्यांना 5086 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट ऑनलाइन पद्धतीने वितरित  करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत आतापर्यंत 12 लाख 58 हजार 243 शेतकऱ्यांना एकूण 10 हजार 115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  पात्र शेतकऱ्यांना लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असून, लाभार्थींची संख्या सातत्याने अद्ययावत होत आहे.आतापर्यंत 13.70 लाख कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यात कोणत्या विभागात किती शेतकऱ्यांना लाभ? 

अमरावती विभाग : 1 लाख 45 हजार 808 शेतकऱ्यांना 1208 कोटींचा लाभ.
नाशिक विभाग : 84 हजार 813 शेतकऱ्यांना 756 कोटींचा लाभ.
छत्रपती संभाजीनगर विभाग : 3 लाख 2 हजार 273 शेतकऱ्यांना 2284 कोटींचा लाभ.
पुणे विभाग : 49 हजार 224 शेतकऱ्यांना 417 कोटींचा लाभ.
नागपूर विभाग : 44 हजार 864 शेतकऱ्यांना 366 कोटींचा लाभ.
कोकण विभाग : 9  हजार 54 शेतकऱ्यांना 54 कोटींचा लाभ

योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत असून, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली या प्रक्रियेचे व्यवस्थापन केले जात आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण ऑनलाइन करण्यात आले.  यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते.

Karj Mafi 2nd Installment : मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, 6,36,036 शेतकऱ्यांना 5086 कोटी रुपये वितरित

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.