गडचिरोली : अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात आगीच्या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने शासकीय रुग्णालयातील (Hospital) दूरवस्था आणि निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. एकीकडे अमरावतीची घटना ताजी असतानाच, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. या रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिला गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र प्रसूतीनंतर (Women) बाळाचा मृत्यू आणि काही तासातच त्या मातेचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
23 ऑगस्टच्या पहाटे जामगिरी येथील जिजा सातर या महिलेला प्रसूतीसाठी चामोर्शीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अकरा वाजेपर्यंत दोन पैकी एकही स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रुग्णालयात नव्हते. त्याचवेळी महिलेची प्रकृती खालावल्याने महिलेला गडचिरोलीच्या रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, बारा वाजताच्या सुमारास महिलेची प्रसूती झाली. मात्र, प्रसुतीवेळी नवजात बाळाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही तासातच अति रक्तस्त्रावामुळे महिलेचाही मृत्यू झाला. चामोर्शी रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळेच बाळ आणि माता दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा या घटनेला कारणीभूत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या पतीने केली आहे.
दरम्यान, माजी पंचायत समिती सदस्य अमिता मडावी यांनी देखील सदर घटनेतील दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. येथील डॉक्टर स्वत:चे खासगी हॉस्पिटल चालवत असून त्यांचे सोनोग्राफी सेंटरही आहे. येथील रुग्णांना ते आपल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये कारवाईसाठी पाठवतात असा आरोपही अमिता मडावी यांनी केला आहे.
गडचिरोलीत मुसळधार पावसाचा कहर पुन्हा पाहायला मिळतोय. दक्षिण गडचिरोलीतील नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि या पूरस्थितीचा धक्कादायक फटका मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलाही बसलाय. जिमलगट्टा येथील 65 वर्षीय मलय्या पन्हटीवार यांचा हेडरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह घेऊन जात असताना आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील नंदीगाव नाल्याचा पूल पुराच्या पाण्याखाली गेला. पाणी वाढल्याने रुग्णवाहिका रस्त्यातच अडकली असून, दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे भामरागड तालुक्यातही पूरस्थिती गंभीर झाली आहे. पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती नद्यांना पूर आला असून, पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने यावर्षी दुसऱ्यांदा भामरागडचा पुन्हा संपर्क तुटला आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोलीतील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि पुराच्या पाण्यातून प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.