मुंबई : महापालिकेमध्ये भाजपच्या नगरसेवकांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि हेवेदावे यावर तोडगा काढण्यात बोलावण्यात आलेल्या बैठकीतच महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापौर रितू तावडे (Ritu Tawde) आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर (Rajeshree Shirwadkar) यांच्यात जुंपल्याची माहिती आहे. या दोन नेत्यांमध्ये मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांच्यासमोरच खडाजंगी झाल्याने त्याची राजकीय चर्चा जोरदार रंगल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, अमीत साटम (Ameet Satam) यांनी महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांना समज दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिकेत एकमेकांशी स्पर्धा न करता काम करण्याच्या सूचना साटम यांनी दिल्याची माहिती आहे.
मुंबईकरांनी आपल्याला चांगलं काम करण्यासाठी निवडून दिलं आहे. त्यामुळे स्वतःचे हेवेदावे बाजूला ठेवून मुंबईकरांसाठी काम करा. पक्षाची प्रतिमा मलीन होईल, असं कोणी कृत्य करू नका, अशा सूचना अमीत साटम यांनी दिल्याची माहिती आहे.
मुंबई भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी घेतलेल्या नगरसेवकांच्या बैठकीतली इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. सोमवारी मुंबई भाजप कार्यालयात भाजपच्या सर्वच नगरसेवकांना बैठकीसाठी बोलविण्यात आले होते. नगरसेवकांच्या एकत्रित बैठकीच्या आधी भाजप अध्यक्ष अमीत साटम यांनी महापौर रितू तावडे, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्यासोबत बैठक घेतली.
याच बैठकीत मुंबई महापालिकेत पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सभागृह नेते यांना अंतर्गत वादाबाबत अमीत साटम यांच्याकडून विचारणा करण्यात आली. तसेच सदस्यांच्या मतभेदावर आणि समन्वयाचा अभाव याची कारणे ही विचारण्यात आली.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकंदरीत महापौरांच्या कामांबाबत मुंबई अध्यक्षांनी प्रश्न उपस्थित केले असल्याचंही कळत आहे.
महापौर विविध कारणांमुळे वादात सापडत असल्याने अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. अशातच महापौरांनी ‘झारीतील शुक्राचार्य’ बोलत अप्रत्यक्षपणे पक्षातील काही जणांवर टीका केली असल्याने यावरही महापौरांना विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून महापौर कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्याची ही कारणे महापौरांना विचारण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही बातमी वाचा: