राहुल गांधी यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र, आदिवासी विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडत म्हणाले... 
राजू सोनावणे August 25, 2026 02:43 AM

नवी दिल्ली :  लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा उल्लेख आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात 22 ऑगस्टला छात्रों की गुंज हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राहुल गांधी यांना पुण्यातील मांजरी येथे सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील आंदोलक विद्यार्थिनी निशा साबळे हिने एक निवेदन दिलं होतं. ते निवेदन देखील लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. 

राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थिनी निशा साबळे सहभागी झाली होती. तिनं आदिवासी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रश्न पोटतिडकीनं मांडले होते. निशा साबळेनं मांडलेल्या समस्यांसह राज्यात सुरु असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राज्य सरकारनं दखल घ्यावी असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?

महाराष्ट्रातील अनेक आदिवासी विद्यार्थी 10  दिवसांहून अधिक काळापासून उपोषण करत आहेत. पुण्यातील 'छात्रों गी गुंज' कार्यक्रमात विद्यार्थिनीनं सांगितलं की वसतीगृहात वास्तव्यासाठी 30 वर्षांची वयोमर्दाया घालण्यात आलेली आहे, अपमानास्पद नियम लागू आहेत. मुलींसाठी प्रेग्नन्सी टेस्ट सारख्या अमानवी गोष्टी लागू आहेत.  

दुर्गम भागातील गाव खेड्यातून आलेले विद्यार्थी दान मागत नाहीयेत, ते त्यांचा अधिकार मागत आहेत. तुम्ही त्यांना व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या समस्या तात्काळ सोडवाल, अशी अपेक्षा असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. 

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय सेवांचा तुटवडा आहे. सर्पदशांमुळं मुलांचा मृत्यू होतोय. महिलांसाठीच्या सुविधांची स्थिती खराब आहे, अशा समस्या राहुल गांधी यांनी मांडल्या आहेत. विद्यार्थिनींच्या फिटनेस टेस्टच्या नावाखाली घेतल्या जाणाऱ्या प्रेग्नन्सी टेस्टची माहिती मिळताच धक्का बसला, असं राहुल गांधी म्हणाले. या नियमामुळं महिलांच्या सन्मानावर आणि त्यांच्या मानवतेवर आघात होतो, असं राहुल गांधी म्हणाले. 

माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी 22 ऑगस्ट रोजी 'छत्रों की गुंज' कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, समस्या ऐकून तर घेतल्याच पण त्याचवेळी त्या मुलींना आपण मला का बोलाविले नाही असे म्हणत त्यांना मोठा धीर दिला होता, असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.