भूकंप नव्हे, ग्लेशियरचा तुकडा, कसा कोसळला?; नेपाळच्या पुराची चक्रावून टाकणारी कहाणी; व्हिडीओने A टू Z समोर आलं!
मुकेश चव्हाण August 27, 2026 04:43 PM

Nepal Floods Marathi News: नेपाळमध्ये आलेल्या अचानक भीषण पुरामुळे मोठी हानी (Nepal Floods) झाली आहे. या जलप्रलयामुळे इमारती, गावच्या गावं, रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. या पुरात आतापर्यंत 165 जणांचा मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, नेपाळमध्ये आलेल्या या पुरामागे भूकंप नसून ग्लेशियरचा मोठा भाग उंचावरून कोसळणे हे प्रमुख कारण आहे. मात्र, चीनने ग्लेशियर तुटण्यामागे नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाला जबाबदार धरले आहे. (Nepal Floods Marathi News)

नेपाळमधील चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी रसुवा येथे आलेल्या भीषण पुराबाबत नेपाळच्या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, या कठीण काळात चीन नेपाळसोबत ठामपणे उभा आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, नेपाळच्या बाजूला भूकंप झाला. त्यानंतर बर्फाचा हिमस्खलन झाला आणि पुढे भूस्खलन झाले. यामुळे ग्यिरोंग-रसुवागढी सीमावर्ती भागातील नेपाळ आणि चीन या दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाली असून अनेक जण बेपत्ता आहेत.

नदीच्या प्रवाहात अचानक प्रचंड वाढ का झाली? (nepal flood reason in marathi)

लॅंगटांग लिरुंग पर्वताच्या उत्तर उतारावर सुमारे 5200 मीटर उंचीवर असलेल्या ग्लेशियरचा खालचा भाग तुटून सुमारे 1200 मीटर खाली दरीत कोसळला. त्यामुळे ल्हेंदे खोला नदीत जाऊन पडल्याने नदीचा प्रवाह अडला आणि तिथे तात्पुरता बांध तयार झाला. हा बांध फुटल्यानंतर पाणी, चिखल, दगड आणि मोठ्या प्रमाणात मलब्याची प्रचंड लाट वेगाने खालीच्या दिशेने वाहू लागली. ल्हेंदे खोला ही तिबेटमधून वाहत येणारी एक उपनदी असून, ती नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी आणि तिमुरे परिसरात भोटेकोशी नदीला मिळते. ग्लेशियर कोसळल्याने किंवा आइस-रॉक एव्हलांच झाल्याने मोठ्या प्रमाणात बर्फ, दगड आणि मलबा ल्हेंदे खोलामध्ये कोसळला. त्यामुळे नदीच्या प्रवाहात अचानक प्रचंड वाढ झाली.

काही मिनिटांतच पाण्याची पातळी वाढली- (nepal flood reason in marathi)

पुराचे पाणी आणि मलबा सर्वप्रथम भोटेकोशी नदीत पोहोचले. भोटेकोशी नदी तिबेटमधून नेपाळमध्ये प्रवेश करते आणि रसुवा जिल्ह्यातून वाहते. तिमुरे परिसरातून पुराचे पाणी भोटेकोशी नदीच्या प्रवाहासोबत पुढे गेले. पुढे भोटेकोशी नदी त्रिशूली नदीला मिळते. त्यामुळे पुराचे पाणी त्रिशूली नदीतही पोहोचले आणि नुवाकोट, धादिंग यांसारख्या खालच्या भागांमध्येही पसरले. त्रिशूली नदीची पाणीपातळी काही ठिकाणी अवघ्या 30 मिनिटांत 7 ते 9 मीटरने वाढली होती.

पुरापूर्वी आणि पुरानंतरची छायाचित्रे- (Nepal Floods Marathi News)

प्लॅनेट लॅब्सने पुरापूर्वी आणि पुरानंतरची सॅटेलाइट छायाचित्रे शेअर केली होती. त्यामध्ये केलेल्या प्राथमिक अभ्यासातूनही असे समोर आले की, बर्फ आणि दगडांच्या भूस्खलनामुळे ल्हेंदे नदीत मलब्याने भरलेला पूर आला. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) एक व्हिडीओ शेअर करताना म्हटले की, प्लॅनेट लॅब्सच्या सॅटेलाइट छायाचित्रांच्या विश्लेषणावर आधारित प्राथमिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, नेपाळ-चीन सीमेवरील रसुवागढी बॉर्डर क्रॉसिंगपासून सुमारे 20 किलोमीटर ईशान्येला बर्फ आणि दगडांचे भूस्खलन झाल्याने ल्हेंदे नदीत ग्लेशियरशी संबंधित पूर आला.

नेपाळमध्ये महाप्रलय, VIDEO:

संबंधित बातमी:

Nepal Floods Marathi News: चिखलात अडकलेल्या इमारती, 1 सेकंदात गायब झालेली लोक; नेपाळ पुरातील काळीज चिरणारे 8 फोटो

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.