IND vs SL Test: भारत श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ, पण नोंदवले गेले इतके सारे विक्रम; काय ते जाणून घ्या
GH News August 27, 2026 10:19 PM

भारत श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर ड्रॉ झाला. या सामन्यात श्रीलंकेच्या शेपटच्या फलंदाजांनी झुंजार खेळी केली असं म्हणायला हरकत नाही. या कामगिरीमुळे दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. 2015 सालापासून भारताने श्रीलंकेत सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण या ड्रॉमुळे ही मालिका खंडित झाली आहे. कोणत्याही विदेशी संघाची श्रीलंकेतील ही सर्वात मोठी विजयी मालिका होती. आता भारत, ऑस्ट्रेलिया (1999 ते 2011) आणि इंग्लंड (2012 सालापासून 2021) या तिन्ही देशांच्या नावावर प्रत्येकी सहा विजयांचा संयुक्त विक्रम आहे. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये फॉलोऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेने आघाडी घेण्याची ही फक्त आठवी वेळ होती. या सामन्यात घेतलेली 216 धावांची आघाडी ही श्रीलंकेची इतिहासातील सर्वोच्च ठरली. यापूर्वी 2006 मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध त्यांनी 178 धावांची आघाडी घेतली होती.

श्रीलंकेकडून या विक्रमांची नोंद

  • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फॉलोऑन मिळाल्यानंतर दोन्ही डावात शतकी खेळी करण्याचा दुर्मिळ विक्रम सोनल दिनुषाच्या नावावर नोंदवला गेला आहे. अशी कामगिरी करणारा सोनल दिनुषा हा तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी विजय हजारे यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1948 मध्ये 116 आणि 145 धावांची खेळी केली होती. तर 2001 मध्ये अँडी फ्लॉवरने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 142 आणि 199 धावा केल्या होत्या.
  • फॉलोऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेने कसोटी सामना वाचवण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 1994 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध , 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध, 2010 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि आता भारताविरुद्ध फॉलोऑन मिळाल्यानंतर सामना ड्रॉ करण्यात यश मिळालं आहे.
  • सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना दोन्ही डावात शतक ठोकण्याच दुर्मिळ विक्रम सोनल दिनुषाच्या नावावर नोंदवला गेला आहे. अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी एलन बॉर्डर, तिलकरत्ने दिलशान, धनंजय डिसिल्वा, कामिंदू मेंडिस यांनी हा विक्रम केला आहे. या पंगतीत आता सोनल दिनुषा बसला आहे.
  • कसोटी मालिकेत स्वीप शॉट मारून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सोनल दिनुषाच्या नावावर नोंदवला गेला आहे. एका मालिकेत सोनल दिनुषाने 173 धावा केल्या. तर जो रूटने श्रीलंकेविरुद्ध 2021 मध्ये 160 धावा, तर बेन डकेटने पाकिस्तानविरुद्ध 2022 मध्ये 112 धावा केल्या होत्या.
  • श्रीलंकेच्या आठव्या ते 11व्या क्रमांकाच्या फलंदाजांनी मिळून तब्बल 292 चेंडूंचा सामना केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फॉलोऑन मिळाल्यानंतर तळाच्या फलंदाजांनी एकाच डावात एवढ्या मोठ्या संख्येने चेंडू खेळण्याची ही सहावी सर्वोच्च वेळ आहे. 1938 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक 780 हून अधिक चेंडू , 2001 मध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडविरुद्ध 410 चेंडू, 1968 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध 368 चेंडू, 1979 मध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध 335 चेंडू, 1999 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 312 चेंडू, आता श्रीलंकेने भारतविरुद्ध 292 चेंडू खेळून या यादीत सहावे स्थान मिळवले आहे.
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.