Mukesh Khanna Reject Ranveer Singh For Shaktiman : 90 च्या दशकातील लोकप्रिय मालिका 'शक्तिमान' (Shaktiman) मुळे घराघरांत पोहोचलेले अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 'शक्तिमान'वर आधारित बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) या चित्रपटात शक्तिमानची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक होता. त्याने मुकेश खन्ना यांची मनधरणी करण्यासाठी 3 तास विनवणी केली, मात्र मुकेश खन्ना यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.
या एका निर्णयामुळे आपले कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले, तरीही आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही, असा खळबळजनक खुलासा मुकेश खन्ना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
सुभोजित घोष यांच्याशी बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, "रणवीरला शक्तिमान बनण्यात खूप रस होता. तो माझ्याकडे आला आणि 3 तास बसून मला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. मला त्याला नकार देताना अपराधी वाटत होते, पण मला शक्तिमानच्या भूमिकेसाठी जो चेहरा हवा होता, तो त्याच्यात दिसला नाही. त्या 3 तासांत तो प्रचंड एनर्जीने भरलेला होता. तो माझ्या शेजारी जमिनीवर बसला, त्याने मला पूर्ण कहाणी ऐकवली. देव आनंद यांच्यानंतर मी एवढी ऊर्जा असलेला कलाकार फक्त रणवीरलाच पाहिले आहे. तो एका ठिकाणी शांत बसूच शकत नव्हता, कधी इकडे तर कधी तिकडे फिरत होता, अगदी टेबलवरही चढून बसला होता."
नकारामागील कारण आणि झालेल्या आर्थिक नुकसानाबद्दल सांगताना ते म्हणाले, "व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिल्यास मी एका मूर्खासारखे वर्तन केले. माझ्या हातात कोट्यवधी रुपयांचा चेक होता. माझ्या ऑफिसमधील लोकांनी मला सांगून पाहिले की सर, चेक स्वीकारून घ्या, नंतर आपण भांडू. पण मी त्यांना स्पष्ट शांत राहण्यास सांगितले. माझ्यासाठी तत्त्व आणि मूल्ये पैशांपेक्षा मोठी आहेत."
निर्मात्यांसोबत झालेल्या मतभेदांवर ते पुढे म्हणाले, "त्यांनी अट घातली होती की, ते माझा सल्ला घेतील पण चित्रपट त्यांच्या पद्धतीनेच बनवतील. मला भीती होती की उद्या ते शक्तिमानला डिस्कोमध्ये डान्स करताना दाखवतील किंवा भलतेच काहीतरी करतील. म्हणूनच मी शक्तिमानचा वारसा (Legacy) सुरक्षित ठेवण्यासाठी त्या कोट्यवधींच्या चेकला नकार दिला."
मुकेश खन्ना यांनी ट्रोल्सना उत्तर देताना सांगितले की, मी या विषयावरून पुढे का जाऊ? शक्तिमान मी बनवला आहे.
13 सप्टेंबर 1997 रोजी 'शक्तिमान' मालिका पहिल्यांदा प्रसारित झाली होती आणि 2005 मध्ये तिचा शेवटचा भाग दाखवला गेला होता. मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या या मालिकेत मुकेश खन्ना यांच्यासोबत वैष्णवी महंत, सुरेंद्र पाल, टॉम अल्टर, नवाब शाह आणि किटू गिडवाणी या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
ही बातमी वाचा: