एकटा पाहून आरोपीनं डाव साधला, मध्यरात्री झाडावरुन घरात शिरला, झोपल्या जागीच व्यक्तीला संपवला, धक्कादायक घटनेनं माढ्यातील जामगाव हादरलं  
गणेश लटके August 28, 2026 03:13 AM

Solapur Madha Crime News : सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माढा तालुक्यातील जामगावमध्ये (Jamgaon) एका 61 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री झोपल्या जागेतच ही हत्या करण्यात आल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अशोक भिमाण्णा मुळे सं मृत व्यक्तीचं  नाव आहे. दरम्यान, अशोक मुळे यांच्या घरातील बाकीचे सर्व सदस्य देवदर्शनासाठी कर्नाटकमध्ये गेले होते. त्यावेळीच डाव साधून अज्ञाताने हे कृत्य केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पंचनामा करुन पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. 

नेमकी घटना काय?

माढा तालुक्यातील जामगावात हादरवणारी घटना घडली आहे. 61 वर्षीय अशोक मुळ यांची हत्या करण्यात आली आहे. झोपल्या जागीच त्यांना संपवण्यात आलं आहे. धारधार हत्याराने त्यांच्या डोक्यात वार करण्यात आले आहेत. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. 

चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यानं ही हत्या केल्याचा संशय

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यानं ही हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कारण, घरातील सगळे साहित्य कपाटे उचकल्याचे माहिती मिळाली आहे. तसेच घरातील सोने, रोख रक्कम देखील चोरीला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांचा मुलगा विजयकुमार अशोक मुळे यांनी माढा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरातील सोने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. 

घरात एकटेच असल्याचं पाहून साधला डाव

दरम्यान, मृत व्यक्ती अशोक मुळे यांच्या घरी त्याची पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. मात्र, घरातील सगळे सदस्य देवदर्शनासाठी कर्नाटकला गेले होते.  अशोक मुळे हे एकटेच घरात होते. चोरट्याने हाच डाव साधून हत्या करत घरात चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेची तात्काळ माहिती अशोक मुळे यांच्या कुटुंबियांनी देण्यात आली होती. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य तातडीने घराकडे निघाले होते. घरी आल्यानंतर अशोक मुळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला देह पाहून कुटुंबियांनी टाहो फोडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

तीन चार ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी कैद

माढा पोलिस स्टेशनसह सोलापूर पोलिसांच्या पथके देखील जामगावमध्य दाखल झाली आहेत. पोलिसांनी वेगाने तपासाची सुत्र फिरवली आहे. रस्त्यावरील मुख्य मार्गावर असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन चार ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हत्या करणारा व्यक्ती दुचाकीवर जाताना कैद झाला आहे. घराच्या मागे असलेल्या झाडावरुन हा आरोपी घरात शिरल्याचे कैद झाले आहे. डोक्यावर हेल्मेट लावल्यामुळं आरोपीची ओळख अद्याप पटलेली नाही. ज्या दिशेनं आरोपी गेला आहे, त्या दिशेनं पोलिसांनी तपास सुरु केला आहे.  

100 वर्षाच्या काळात गावात अशी घटना घडली नाही, आरोपीला कठोर शिक्षा करा, गावकऱ्यांची मागणी

दरम्यान, अशोक मुळे यांच्या हत्येनं जामगावमधील लोकांना एक धक्काच बसला आहे. प्रत्येकाशी आपुलकीने वागणारा, कर्वांशी बोलून चालून राहणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्यात आल्यानं गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. गेल्या 100 वर्षाच्या काळात आमच्या गावात अशी दुर्दैवी घटना घडली नसल्याची माहिती एबीपी माझाशी बोलताना गावकऱ्यांनी दिली आहे. असा घटना घडून नये म्हणून पोलीस प्रशासनाने तात्काळ या घटनेचा तपास करुन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.  

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.