मुंबई : राज्यातील काही शैक्षणिक (Education) संस्थांकडून विद्यार्थी आणि पालकांची अतिरिक्त फी, किंवा इतर फीच्या नावाखाली पिळकवणूक होत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील इंजिनिअरींगच्या कॉलेजकडून (Engineering) तशी शैक्षणिक फी शिवाय अधिकची रक्कम आकारली जात असल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियातून समोर आल होते. तर, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षास इंजिनिअरींगच्या विद्यार्थी, व पालकांनीही तक्रारी केल्या आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर मंजूर नसलेले नियमबाह्य शुल्क आकारताना आढळल्यास, संबंधित संस्थेवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे शुल्क नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षास इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांचे पालक आणि काही लोकप्रतिनिधींकडून प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अनेक संस्था अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून अवाजवी नियमबाह्य शुल्क आकारत आहेत. पालकांनी आपल्या तक्रारी इंजिनिअरींग कॉलेजकडून रोख स्वरुपात किंवा इतर कारणास्तव अवाजवी पैशांची मागणी केली जात असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर, सीईटी सेलने संबंधित तक्रारींची दखल घेत महाविद्यालयांना कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिलाय.
संबंधित सर्वांना याद्वारे सूचित करण्यात येते की, शुल्क नियामक प्राधिकरण हे संपूर्ण संस्थेसाठी शुल्क मंजूर करते. शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या शुल्काच्या व्यतिरीक्त अतिरिक्त शुल्क, रोखीने मागणी केलेले शुल्क इत्यादी घेणे बेकायदेशीर आणि पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सर्व संस्थांनी केवळ शिक्षण शुल्क प्राधिकरणाने मंजूर केलेले अचूक शुल्कच आकारणे बंधनकारक आहे, तसेच अधिकृत मंजुरी आदेश त्यांच्या सूचना फलकांवर आणि संकेतस्थळांवर प्रकाशित करणे आवश्यक आहे.
कोणतीही संस्था मंजूर नसलेले नियमबाह्य शुल्क आकारताना आढळल्यास, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अशा संस्थांमधील नियमबाह्य प्रवेश रद्द करण्यात येतील, याची सर्व संबंधीत संस्थांनी नोंद घ्यावी, असे सीईटी सेलने म्हटले आहे. त्यामुळे, आता राज्यातील कुठल्याही अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारल्यास संबंधित संस्थेला कारवाईला सामोर जावे लागणार आहे.