महाराष्ट्र हे देशातील बहुभाषिक राज्य आहे. येथे अनेक भाषा नांदत आहेत. मात्र, काही लोक दुसरी भाषा शिकण्यास नकार देत आहेत असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी एका कार्यक्रमात केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचेही ते म्हणाले. त्यावर मनसेने संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी मराठीचा अपमान करु नये, महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. हवे तर अमित शाह यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहासाचे पुस्तक आम्ही अमित शाह यांना पाठवू असा इशारा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर अमित शाह यांना पडला आहे. महाराष्ट्र हे बहुभाषिक राज्य आहे असं ते म्हणत आहेत. महाराष्ट्र आणि मराठी माणसांचा अपमान करणारे विधान अमित शाह यांनी हिंदी भाषा संमेलनात येऊन करु नये असा इशारा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले की एका बाजूला ते म्हणतात गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते हिंदी येत नाही आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात येऊन त्यांनी शहाणपणा सांगायचा? इथे हिंदी शिका? ज्याला कोणाला हिंदी भाषेत व्यवहार करायचा आहे तो नक्की हिंदी शिकेल. हिंदी भाषा संमेलनाच्या आडून मराठी भाषेवरती आक्रमण करून महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान करणं हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. तामिळनाडूमध्ये आंध्र प्रदेशात किंवा दक्षिणेतल्या राज्यांमध्ये अशी भाषा अमित शाह करू शकणार आहेत का? असा सवाल देखील गजानन काळे यांनी दिला आहे.
अण्णा मलाई यांनी मध्यंतरी उदाहरण दिलं होतं की, हिंदी लादल्यामुळे भाजपला तामिळनाडूमध्ये एका खासदाराच्यावर यश मिळालं नव्हतं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहासाचे पुस्तक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठवू म्हणजे महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे याचा विसर त्यांना पडणार नाही असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.