दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
एबीपी माझा ब्युरो September 14, 2026 10:43 PM

मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाला आता पुन्हा एक नवं वळण लागलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात नव्याने आदेश दिल्यानंतर सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी नावे असल्याचं उघड झालं आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबानुसार नवा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. 

8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड इथे एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, म्हणजेच 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याचं जीवन संपवलं होतं. आता सीबीआयनं एफआयआर दाखल केल्याने याप्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आदित्य ठाकरेंसह अनेक नावांचा समावेश

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सीबीआयनं मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार नव्याने गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाचा उल्लेख आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  प्रकरण दडपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. या जबाबात उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे, अभिनेता सूरज पांचोली, दिनो मोरिया, रिया चक्रवर्ती यांच्या नावांचाही उल्लेख आहे. 

फाइल्स आणि सरकारी नोंदी नष्ट करणे किंवा दडपणे, त्यात फेरफार करणे, आरोपींना वाचवण्यासाठी सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करणे, यासारख्या प्रकरणांची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी सतीश सालियन यांनी जबाबात केली आहे. 

Satish Salian Statement : दिशाच्या वडिलांचा सीबीआयला जबाब काय? 

- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील कटात हात

- आरोपींना वाचवण्यासाठी पदाचा दुरूपयोग केल्याचा आरोप

- आदित्य ठाकरे, रोहन रॉय, दिनो मोरिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंह, अनिल देशमुख यांच्यावर आरोप

- मुख्य गुन्ह्याचा कट रचणे, आत्महत्येची कहाणी तयार करणे, पुरावा नष्ट करणे असे आरोप. 

या बड्या नावांसोबत दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई पोलिसातील काही अधिकाऱ्यांच्यावरही आरोप केले आहेत. त्यामध्ये पोलीस उपाआयुक्त विशाल ठाकूर, पोलीस निरीक्षक जगदेव कलापाड, पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, पोलीस निरीक्षक चिमाजी जाधव, पोलीस निरीक्षक अर्जुन राजने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक देवढे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 

दरम्यान, या प्रकरणावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची फाईल आधी याच सरकारने बंद केली होती. आता या प्रकरणात सुडाचं राजकारण नाकारता येत नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.