शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
नरेंद्र बंडबे September 15, 2026 12:43 AM

BLOG : दिग्दर्शिका आणि लेखिका शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी' (2026) - 'The One Who Plays’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा डंका वाजवलाय. या चित्रपटाला रशियातील प्रतिष्ठित 'कझान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात' (Kazan International Film Festival) 'बेस्ट शॉर्ट फिल्म' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

'खिलावडी' हा चित्रपट सध्या जगभरातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने यापूर्वी कॅनडातील 'फॅसिनेशियन फिल्म फेस्टिव्हल' (Fascinasian Film Festival) मध्येही पुरस्कार जिंकलाय. याशिवाय, फ्रान्समधील 'फेस्टिव्हल डू फिल्म डी नॅन्सी' (Festival du Film de Nancy) मध्येही या चित्रपटाची अधिकृत निवड झालीय. विशेष म्हणजे, या दोन्ही आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये 'लाँग शॉर्ट फिल्म' (Long Short Film) श्रेणीत भारताचं प्रतिनिधित्व करणारा 'खिलावडी' हा एकमेव चित्रपट ठरला.

आता भारतात होणार स्क्रीनिंग 

परदेशातील चित्रपट महोत्सव गाजवल्यावर आता 'खिलावडी' भारतीय प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झालाय.  भारतातल्या नामांकित 'जागरण फिल्म फेस्टिव्हल' (Jagaran Film Festival) मध्ये 'खिलावडी'चे स्क्रीनिंग केलं जाणारेय. 

काय आहे 'खिलावडी'ची कथा?

हा चित्रपट मध्य प्रदेशातील एका अशा समाजावर आधारित आहे, जो आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहे. आपल्या देशात अशा अनेक जमाती आहेत, ज्यांनी स्वातंत्र्याचा अर्थ काय असतो हे अजून अनुभवलेले नाही. जुन्या रूढी-परंपरा आणि सामाजिक परिस्थितीमुळे हा समाज आजही दलदलीत अडकला आहे. जर कोणी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर स्पर्धेच्या या युगात मागे पडतो आणि पुन्हा त्याच जुन्या, कायद्याने बंदी असलेल्या कामांकडे वळण्यास भाग पडतो. ‘खिलावडी’ चित्रपट मध्य प्रदेशातील अशाच एका 'बांछडा' (Banchhada) या विमुक्त जमातीतल्या मुलींच्या वास्तविक जीवनावर प्रकाश टाकतो. ही कथा आहे एका १२ वर्षांच्या मुलीची; तिला डॉक्टर व्हायचे आहे. जुन्या सामाजिक चौकटी मोडून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची तिची धडपड आणि बदलाच्या शक्यतांवर या चित्रपटात भर दिलाय. 

’पिछले पन्ने की औरतें' आणि 'खिलावडी’

प्रसिद्ध लेखिका शरद सिंह यांच्या ‘पिछले पन्ने की औरतें’ या पुस्तकात मध्य प्रदेशातील या अनिष्ट प्रथेवर जोरदार आसूड ओढलेत. हे रिपोर्टाज आहेत. मध्य प्रदेशात अशा अनेक जमाती आहेत, ज्यांमधील स्त्रियांना सामाजिक प्रथेचा भाग म्हणून देहविक्रयाच्या दलदलीत ढकललं जातं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांचा सौदा करणारे हे त्यांच्या घरातील ‘कर्ते पुरुष’च असतात. म्हणजेच घरातील बाप किंवा भाऊ आपल्या मुलीला किंवा बहिणीला परपुरुषाला विकतो. 

काही समाजांमध्ये स्त्रीला काही वर्षांसाठी भाड्याने घेण्याचीही प्रथा आहे. त्यातून जन्माला येणाऱ्या मुलांची जबाबदारी स्त्रीचीच, अशी पुरुषसत्ताक आखणी या समाजात केलेली आहे. 

'खिलावडी'तली मुलगी ही अशाच संबंधातून जन्मलेली आहे. आपल्याकडे फासेपारधी समाजावर जसा 'चोर आणि दरोडेखोर' असा ठप्पा लावला गेला आहे, तसाच हा बांछडा समाजही पोलीस आणि समाजाच्या नजरेत गुन्हेगार ठरवला गेलाय. या समाजातल्या महिला वेश्याव्यवसाय करतात, हायवेला किंवा नाक्यावर उभ्या राहतात. तिथेच उभे राहून यांचा सौदा घरातले पुरुष करत असतात. घर चालवण्याची आणि पैसे कमवण्याची जबाबदारी महिलांची; तर पुरुष फक्त तिचा व्यवहार करणार आणि आराम करणार, अशी विचित्र आणि विकृत पुरुषसत्ताक रचना इथं तयार झालीय.

मध्यंतरी राजधानी दिल्लीला लागून असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या महिलांच्या खरेदी-विक्रीच्या बाजाराविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली. अनेक स्वयंसेवी संस्था (NGO), पोलीस आणि सरकारही कामाला लागले होते. परंतु, समाजात मुरलेली ही कुप्रथा आजही सुरूच आहे, हेच शोभिता ठाकूर यांच्या चित्रपटातून समोर येतं.

शोभिता ठाकूर यांनी या संवेदनशील विषयाला जागतिक मंचावर आणलंय. असे करून त्यांनी या गंभीर समस्येकडे जगाचे केवळ लक्षच वेधले नाही, तर भारतीय सिनेमाची ताकदही दाखवून दिलीय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.