खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
एबीपी माझा ब्युरो September 15, 2026 02:43 AM

Rajasthan Local Body Election Results : राजस्थान पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने (BJP) दणदणीत विजय नोंदवला आहे. या घवघवीत यशावर आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले असून, "हा कौल म्हणजे असत्याच्या आव्हानावर सत्याने मिळवलेला विजय आहे," अशी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत राजस्थानच्या जनतेने डबल इंजिन सरकारच्या सुशासन आणि विकास धोरणांवर पुन्हा एकदा विश्वासाची मोहोर उमटवली असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

Modi Shah Rajnath Reactions : मोदी, शाह आणि राजनाथ सिंह यांच्या प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "माझ्या परिवारातील सदस्यांनी दिलेल्या या जनादेशामुळे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की, सुशासन आणि विकासाच्या धोरणांना जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे. राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आणि जनसामान्यांचे जीवन समृद्ध करण्याचा आमचा संकल्प यामुळे अधिक बळकट होईल."

अमित शाह यांनी राजस्थानी भाषेत पोस्ट करत लिहिले, "काँग्रेसच्या कुशासनातून आणि भ्रष्टाचारातून मुक्त करून भाजप सरकार राज्याच्या विकासाला गती देत आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, प्रदेशाध्यक्ष मदन राठोड आणि कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन."

"राजस्थानमधील निकाल हे सिद्ध करतात की विकास आणि सुशासनाचे दुसरे नाव 'भारतीय जनता पक्ष' आहे. विकसित राजस्थानच्या ध्येयाकडे हे राज्य निरंतर पुढे जात राहील," असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

"भ्रम पसरवणाऱ्यांना आणि नाराज घटकांना बाजूला सारून राजस्थानच्या जनतेने कल्याणकारी धोरणे, विकास आणि सुशासनाला कौल दिला आहे," असे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन म्हणाले.

Rajasthan City Wise Results : प्रमुख महापालिका आणि शहरांमधील चित्र

एकूण घोषित 10,210 प्रभागांपैकी भाजप 4,171 जागांवर, तर काँग्रेस 3,597 जागांवर विजयी झाली आहे.

उदयपूर : 80 जागांपैकी 53 जागांवर भाजपचा विजय.

भीलवाडा : 70 पैकी 45 जागांवर भाजपची आघाडी/विजय.

कोटा : 100 पैकी 53 जागांवर भाजपने वर्चस्व मिळवले.

जोधपूर : भाजप आणि काँग्रेस यांच्यात तगडी झुंज पाहायला मिळाली असून दोघांनी प्रत्येकी 44-44 जागा जिंकल्या; तर 10 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

काँग्रेसची आघाडी : बीकानेर, अजमेर आणि पाली शहरांमध्ये काँग्रेसने भाजपपेक्षा सरस कामगिरी केली, तर जयपूर आणि अलवारमध्ये भाजप पुढे राहिला.

CM Home District Result : मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात अपक्षांची बाजी

मुख्यमंत्र्यांच्या आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यांमध्ये अपक्ष उमेदवारांनी धक्कादायक कामगिरी केली आहे. 

भरतपूर (मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा गृहजिल्हा) : 65 जागांपैकी 36 जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय/आघाडी मिळवून सर्वांना थक्क केले. येथे भाजपला 20 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या.

पाली (प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांचे गृहशहर) : 65 जागांपैकी काँग्रेसने 29, भाजपने 21 तर अपक्षांनी 15 जागांवर विजय मिळवला.

अजमेर : 80 जागांपैकी काँग्रेसने 37, भाजपने 32 आणि अपक्षांनी 11 जागांवर विजय नोंदवला.

राज्यभरात तब्बल 2,272 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाल्यामुळे अनेक नगर निकोयांमध्ये सत्ता स्थापनेसाठी अपक्ष नगरसेवक निर्णायक भूमिकेत असणार आहेत.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.