आई 250 रुपयाने मजुरीला जातेय, लेकानं मिळवली 14 लाखांची फेलोशीप; माऊलीच्या कष्टाचं चीज झालं
महेश गलांडे August 28, 2024 06:31 PM

मुंबई/धाराशिव : केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, हे सुभाषित प्रयत्नांची पराकाष्टा करुन यश मिळवणाऱ्यांसाठीच आहे. परिस्थितीश दोनहात करुन, संघर्षांची पाऊलवाट तुडवत भविष्य घडवणाऱ्या प्रतिकृत परिस्थितीतही मार्ग काढणाऱ्यांचा आदर्श समाजात निर्माण होत असतो. काही दिवसांपूर्वी सीए परीक्षेचा निकाल लागला, त्यामध्ये एक भाजीविक्रेत्या आईने आपल्या लेकास इथपर्यंत मजल मारण्यासाठी घेतलेल्या कष्टाचं चीझं झाल्याचं दिसून आलं. त्याचप्रमाणे, शेतमजूर (farmer) म्हणून रोजंदारीने कामाला जाऊन आईने (Mother) पोराला शिकवलं आणि पोरांनं नाव कमावल्याची प्रेरणादायी सत्यकथा समोर आलीय. 250 रुपयाने रोजानं कामाला जाणाऱ्या आईच्या मुलाला 14 लाख रुपयांची फेलोशिप (Fellowship) मिळाल्याचा आनंद सर्वांनाच झाला आहे. आईच्या कष्टाचं चीज झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.   

राजधानी दिल्लीतील अशोका विद्यापीठाकडून दरवर्षी 100 जिज्ञासू तरुणांची फेलोशिपसाठी निवड करण्यात येते. या फेलोशिपसाठी 2-3 हजार लोकवस्ती असलेल्या सुटका गावातील समाधान गलांडे याची निवड झाली आहे. समाधान महाराष्ट्राच्या दुष्काळी मराठवाड्यात असलेल्या धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातील सुकटा येथील एका रोजंदारी मजुराचा मुलगा आहे. कुटुंबात अल्पभूधारक शेती आहे, पण तेवढ्या शेतीवर उदरनिर्वाह चालत नसल्याने आईला रोजंदारीवर कामाला जावं लागतंय. मुलाच्या शिक्षणासाठी, कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आई शेतमजूर म्हणून कामाला जाते. मात्र, आज मुलाने मिळवलेल्या यशामुळे तिचे हे कष्ट सार्थकी लागले आहेत.  

समाधान दहावीत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले, त्याची दहावी बोर्डाची परीक्षा केवळ दोन महिन्यांवर आली होती तरीही डगमगून न जाता समाधान मोठ्या हिमतीने उभा राहिला आणि दहावीला त्याला 81% गुण मिळाले. दहावीनंतर परिस्थिती हलाखीची असल्यामुळे समाधानाने बार्शी येथील महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. घरच्या परिस्थितीशी दोन हात करत कसे बसे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि पुणे येथे पदवीधर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर, पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला. पण, येथील दी़ड लाख रुपयांची फी भरणे शक्य नसल्याने त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, संकटातील तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना मदत मिळते, तसेच काहीसे घडले. समाधानच्या मदतीसाठी  या अडचणीवेळी त्याचे मित्र धावून आले, समाधानच्या मित्रांनी त्याची फी भरुन त्याला पुढील शिक्षणासाठी साथ दिली.  

अशोका विद्यापीठाच्या एका वर्षाच्या फेलोशिप प्रोग्रामसाठी समाधानने अर्ज केला आणि त्यात त्याची निवड झाली आहे. या 1 वर्षाच्या फेलोशिपसाठी समाधानला आता 14 लाख रुपये स्टायफंड मिळणार आहे. संघर्षाच्या आणि बौद्धिक क्षमतेच्या जोरावर समाधानची अशोका विद्यापीठाच्या फेलोशिपसाठी निवड झाल्याने त्यांचं हे यश ग्रामीण भारतातील लक्षवधी युवकांना प्रेरणा देणारे आहे. विशेष म्हणजे आजही दररोज सकाळी समाधानी आई 250 रुपये रोजाने शेतमजुरीच्या कामाला जाते, समाधानच्या कर्तुत्वाची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू आईच्या कष्टाचं सार्थक झाल्याची साक्ष देणारच आहे. 

हवामान बदलाचा अभ्यास करणार

दरम्यान, 20 जुलैपासून समाधानचे अशोक विद्यापीठातील वर्ग सुरू झाले असून तो हवामान बदल आणि संबंधित समस्यांचा अभ्यास करणार आहे. कारण, हवामान बदल ही जागतिक समस्या आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसतो. समाधानला शेतीची पार्श्वभूमी असल्याने, तो या क्षेत्रात काहीतरी करण्यासाठी धडपडत आहे. अन्न पुरवठा साखळीतील अपुरेपणा आणि साठवण सुविधांचा अभाव या शेतकऱ्यांसाठी प्रमुख समस्या आहेत. या दोन्ही सुविधांअभावी पिकांचे नुकसान होते. त्यामुळे, शेतीच्या क्षेत्रात या अभ्यासाचा फायदा व्हावा, असे त्याा वाटते. 

“प्रत्येकाला बळीचा बकरा हवाय…” विकास दिव्यकीर्ती UPSC उमेदवारांच्या मृत्यूमुळे 'टार्गेट' झाल्यानंतर म्हणाले...

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.