दहावी बारावीच्या परीक्षांचा पॅटर्न बदलणार? राज्य अभ्यासक्रम आराखडा लागू झाल्यानंतर सत्र परीक्षा पद्धती राबवण्याची शक्यता
जयदीप मेढे September 03, 2024 12:13 PM

पुणे: केंद्र सरकारनं देशभरात नवीन शिक्षण धोरण लागू केलं आहे. या शिक्षण धोरणाद्वारे शिक्षण प्रक्रियेत अनेक बदल प्रस्तावित आहेत. विविध राज्यांमधील शिक्षणाचा आकृतीबंध देखील बदलणार आहे. शिक्षण धोरणात सुचवल्या प्रमाणं शैक्षणिक स्तर 5+3+3+4 असे असणार आहेत. सध्या सुरु असलेल्या परीक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांना एखाद्या विषयाचं किती आकलन झालं हे लेखी परीक्षेद्वारे पडताळलं जातं. मात्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यक्रम तयार केलेला आहे. 


राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं तिसरी ते बारावी या वर्गांसाठी अभ्यासक्रम आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पॅटर्नमध्ये देखील बदल होणार आहेत. सुरुवातीला नववी आणि अकरावीसाठी हा आराखडा लागू केला जाईल. त्यानंतर दहावी बारावी साठी हा आराखडा लागू  केला जाईल त्यानंतर बदललेल्या पॅटर्ननं परीक्षा होईल, अशी माहिती आहे. 
     

राज्य अभ्यासक्रम आराखाड्यानुसार माध्यमिक स्तराचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आलं आहे. पहिल्या स्तरात नववी आणि दहावी, तर दुसऱ्या स्तरात अकरावी आणि बारावी असं वर्गीकरण असेल. नववी आणि दहावीला दोन भारतीय भाषा आणि एक विदेशी भाषा अभ्यासाला असेल. याशिवाय गणित, संगणकीय विचार, सामाजिक शास्त्रे, कला, शिक्षण, शारीरिक शिक्षण व निरामयता, व्यावसायिक शिक्षण आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्रे हे विषय असतील. यैपैकी कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाचं स्थानिक पातळीवर परीक्षण होईल. 

 अकरावी आणि बारावी दुसऱ्या स्तरात असून यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडची स्वातंत्र्य असेल. व्यावसायिक व शैक्षणिक असं विभाजन राहणार नाही. विद्यार्थ्यांवरील आशयाचं ओझं कमी करुन चिंतन करण्यास अधिक वेळ असेल. दोन भाषांचा अभ्यास करावा लागेल, त्यापैकी एक भारतीय असावी. विषय गट असतील त्यापैकी दोन गटातून चार विषयांची निवड करावी लागेल.

दहावी बारावीसाठी सत्र परीक्षा पद्धती 

दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा   जोर अनेकदा विषय समजावून न घेता केवळ पाठांतर करण्यावर असतो. त्याऐवजी विद्यार्थ्यांना विषय किती समजला आहे याचं आकलन, त्याचं वास्तव जीवनात किती उपयोजन करता येतं याची चाचणी घेतली जाणार आहे. 

सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा वार्षिक पद्धतीनं होते.नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार सत्र परीक्षा पद्धती स्वीकारावी, असं प्रस्तावित आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा सत्र पद्धतीनं देखील घेतली जाऊ शकते. हे बदल 2025-26 नंतर अंमलात येतील. 


विद्यार्थ्यांमध्ये नववी ते बारावी या चार वर्षांच्या काळात विचार, शिक्षण सराव आणि सर्जनशील अभिव्यक्तीमध्ये परिप्कवता आणण्याचा प्रयत्न असेल. कामात सर्जनशीलता, नवकल्पनांना प्रोत्साहन हे अधिक महत्त्वाचं असेल.     

इतर बातम्या : 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.