गुजरातच्या सुरेंद्रनगर येथील आयपीएस स्कूलच्या मॅनेजमेंटने चौथीच्या विद्यार्थ्यांना मेसेज पाठवत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आवाहन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेचा भाजप नेते महेंद्र पटेल यांच्याशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरातमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पक्षाचे सदस्य वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर होत असल्याच्या घटना वाढत असून आता आणखी एका शाळा चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.
10 सप्टेंबर रोजी सुरेंद्रनगरच्या कुमारी एमआर गार्डी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कथितरित्या भाजपचे सदस्यत्व देण्यात आले होते. दरम्यान याबाबतचे वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
शाळेच्या मॅनेटमेंटने "GUJ 4C IPS" नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर एक लिंक शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, "आम्हाला भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्य मोहिमेत तुमचे सहकार्य मिळावे ही विनंती."
दरम्यान हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने याबाबत मौन बाळगले आहे. तसेच माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचेही टाळले. शाळेशी संबंधित असेलेले भाजप नेते महेंद्र पटेल यांनीही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.