सोलापुरातील प्रकार! दागिने गहाण ठेवले, पगारावर लोन काढले, ज्यादा पैशाच्या अमिषाने ऑनलाइन गुंतवले 69 लाख, पण हाती ठेंगाच; सोलापुरातील महिलेचीही 1.10 कोटीची फसवणूक
esakal September 13, 2024 01:45 PM

सोलापूर : शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी दिवसांत जास्त पैसा कमावण्याच्या आमिषातून मागील आठ महिन्यात सायबर गुन्हेगारांनी सोलापूर शहरातील जवळपास ७०० जणांना पाच कोटी ६६ लाख रुपयाला गंडवले आहे. तरीदेखील अनेकांना काहीच फरक पडलेला नाही. सोलापूर शहरातील नामांकित बॅंकेतील खुद्द अधिकारीच अवघ्या आठ दिवसांत ६९ लाख रुपयाला फसला आहे. कमी दिवसात जास्त पैसा मिळेल म्हणून घरातील सगळे दागिने बॅंकेत ठेवून आणि स्वत:च्या पगारावर लोन काढून त्यांनी हे पैसे गुंतवले होते.

फेसबुकवर शेअर मार्केटमधून जादा पैसा कमावण्यासंदर्भात काही लिंक असतात. सायबर पोलिसांत धाव घेतलेल्या सोलापुरातील त्या बॅंक अधिकाऱ्याच्या फेसबुकवर ती लिंक आली, त्यावर लगेच क्लिक केले. त्यानंतर लिंक ओपन झाल्यावर एक ॲप आले, तेही डाऊनलोड केले. त्यानंतर व्हॉट्सॲपला त्यांना ज्वॉईन करण्यात आले. त्यावर अनेकांना जादा नफा मिळाल्याचे मेसेज पाहायला मिळाले.

तत्पूर्वी, त्यांना कोल्हापुरातील त्यांच्या मित्राने त्याबद्दल माहिती दिली होती. दोघांनीही त्यात पैसे गुंतवायचे ठरविले आणि एकाचवेळी ५१ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सात दिवसांत आणखी १८ लाख रुपये गुंतवले. त्याचवेळी बॅंक अधिकाऱ्याच्या कोल्हापुरातील मित्रानेही ५१ लाख रुपये गुंतवले होते. त्या दोघांनाही ते पैसे परत मिळाले नाहीत. ना जादा परतावा परत मिळाला ना मुद्दल मिळाले, अशी व्यथा त्यांनी सायबर पोलिसांसमोर कथन केली. त्या दोन्ही मित्रांना शेअर मार्केट, डी-मॅटबद्दल थोडीशी माहिती होती. त्यामुळे त्यांनी धाडस केले, पण ते अंगलट आले. सायबर पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत.

कंत्राटदार महिलेची १.१० कोटींची फसवणूक

कमी दिवसात जादा परतावा मिळेल म्हणून सायबर गुन्हेगारांनी दाखविलेल्या आमिषाला जुळे सोलापुरातील एक महिला कंत्राटदार देखील फसली आहे. त्यांनी शेअर मार्केट ट्रेडिंग ॲपमध्ये तब्बल एक कोटी १० लाख रुपये गुंतवले. त्यातील ४५ लाख रुपये त्यांनी काही दिवसांपूर्वी गुंतवले होते. पण, त्यांना एक रुपया देखील परत मिळाला नाही. सध्या त्या दक्षिण आफ्रिका येथे गेल्या असून त्यांनी सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दिली आहे.

फसवणुकीच्या दोन्ही घटनांचा तपास सुरु

सायबर गुन्हेगार नेहमीच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सावज शोधत असतात. त्यासाठी ते लोकांची मानसिकता ओळखून त्यांना तसे आमिष दाखवतात. पण, कमी दिवसात जादा परतावा कोणीही विनाकारण देत नाही, हे लोकांनी लक्षात ठेवायला हवे. कितीही सांगितले तरी लोक आमिषाला बळी पडतच आहेत. अज्ञान, मोह, घाई या तीन गोष्टींमुळेच फसवणूक होते. लोकांनी सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला ओळखणे काळाची गरज आहे.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.