दिनेश कार्तिकने कसोटी सामन्यापूर्वी प्लेइंग इलेव्हनबाबत सर्वकाही केलं उघड, या खेळाडूंना मिळणार संधी!
GH News September 13, 2024 09:10 PM

माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकचं भारत बांग्लादेश कसोटी मालिकेकडे बारीक लक्ष लावून आहे. कारण ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेत गणित चुकलं तर पुढचं सर्वच बिघडणार आहे. सध्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल स्थानी आहे. तर बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानावर आहे. बांगलादेशने नुकतंच पाकिस्तानला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला होता. त्यामुळे फक्त एकच बदल करून बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. आत्मविश्वास दुणावल्याने त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये फारसा बदल नसेल. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात 4 वेगवान गोलंदाज आणि 4 फिरकीपटूंना संधी मिळाली आहे. असं असताना दिनेश कार्तिकने एक महत्त्वाची माहिती सर्वांसमोर उघड केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळेल? आणि कोणाला डच्चू? याबाबत सांगून टाकलं आहे. दिनेश कार्तिकने उर्वरित दहा कसोटी सामन्यांचं आकलन करून प्लेइंग इलेव्हनबाबत आपलं मत मांडलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल असं सांगितलं आहे.

दिनेश कार्तिकने क्रिकबजशी बोलताना सांगितलं की, ‘भारतीय संघ पहिला सामना वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर खेळेल, असं वाटते. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजा फिरकीपटू म्हणून असतील. भारतीय संघ यावर्षीच्या शेवटी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या कसोटीसाठी तयारी करत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन तीन फिरकीपटूंऐवजी दोन फिरकीपटूंना संधी देईल. तसेच संघात तीन वेगवान गोलंदाज असतील.’

दिनेश कार्तिकने मांडलेलं मत जर तसंच निघालं तर प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि यश दयाल हे गोलंदाज असू शकतात . रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला येतील. तिसऱ्या स्थानावर शुबमन गिल, विराट कोहली चौथ्या, केएल राहुल पाचव्या, ऋषभ पंत सहाव्या, रवींद्र जडेजा सातव्या, आर अश्विन आठव्या, जसप्रीत बुमराह नवव्या, यश दयाल दहाव्या आणि मोहम्मद सिराज अकराव्या स्थानावर असू शकतो.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.