बांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी खेळपट्टीचा खेळ! भारतीय संघ चेन्नईत अशी करणार कोंडी
GH News September 14, 2024 10:10 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघाने गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली सराव सुरु केला आहे. तर बांगलादेशचा संघ 15 सप्टेंबरपासून सराव करणार आहे. बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर धोबीपछाड दिल्याने टीम इंडियाने धास्ती घेतली आहे. यासाठी भारतीय खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहे. दुसरीकडे, बांगलादेशला कोंडीत पकडण्यासाठी बारतीय संघाने एक खास प्लान आखला आहे. या सामन्यासाठी कोणती खेळपट्टी वापरली जाणार याबाबतचं एक अपडेट समोर आलं आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मैदानात शक्यतो काळ्या मातीची खेळपट्टी वापरली जाते. ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करते. तसेच या खेळपट्टीवर खेळण्याचा बांगलादेशला चांगला अनुभव आहे. काळ्या मातीची खेळपट्टी धीमी असते. त्यामुळे काळ्या मातीऐवजी लाल मातीच्या खेळपट्टीवर सामना खेळवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लाल मातीची खेळपट्टी खासकरून वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असते. तसेच भारतीय फलंदाजांना या खेळपट्टीवर चांगला तग धरता येईल. 2019 साली बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा इंदौर आणि कोलकात्यात वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीचा वापर केला होता. तेव्हा भारताच्या फिरकीपटूंनी 40 पैकी 5 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे यावेळी टीम इंडिया असंच काही करण्याचा तयारीत आहे. कसोटीसाठी अजूनही पाच दिवस बाकी आहे.त्यामुळे लवकरच यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.

12 सप्टेंबरापासून टीम इंडियाने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सराव करण्यास सुरुवात केली आहे. टीम इंडियाचं पहिलं शिबीर काळ्या मातीच्या पिचवर पार पडलं. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि विराट कोहलीने यावेळी दोन नेट गोलंदाजांसह काळ्या मातीच्या पिचवर सामना केला. तसेच रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने फलंदाजीत चांगली धमक दाखवली. त्याचबरोबर केएल राहुल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, आकाशदीप आणि यश दयालने पहिल्या दिवशी चांगलाच घाम गाळला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.