अफगाणिस्तानात क्रिकेटवर बंदी? तालिबानच्या निर्णयाने क्रीडाविश्वात खळबळ
GH News September 14, 2024 10:10 PM

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने अल्पावधीतच क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य संघांना पराभूत करत अफगाणिस्तानने लक्ष वेधून घेतलं. तसेच उपांत्य फेरीत स्थान मिळवलं होतं. आता अफगाणिस्तान संघ कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. असं असताना तालिबान सरकारच्या डोळ्यात क्रिकेट खुपलेलं दिसत आहे. त्यामुळे देशात क्रिकेटवर पूर्णपणे बंदी घालण्याची तयारी तालिबान सरकारने केली असल्याची चर्चा आहे. तालिबानी नेता हिबतुल्लाह अखुंदजादा यांनी देशात क्रिकेटवर बंदी घालण्याचे आदेश दिल्याचं वृत्त आहे. याबाबतची बातमी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आली आहे. या वृत्तानुसार, क्रिकेटमुळे देशात वाईट वातावरण तयार होत आहे.तसेच हा खेळ शरिया कायद्याच्या विरोधात असल्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या खेळावर बंदी घालण्यात येत असल्याचं तालिबानचा नेता हिबतु्ला अखुंदजादा याने सांगितलं. देशात तालिबान सरकार आल्यानंतर सरकारने पहिल्यांदा महिला क्रिकेट आणि महिला सहभागी होत असलेल्या इतर खेळांवर बंदी घातली होती. आता पुरुष क्रिकेटवरी बंदी घालणार असल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.

तालिबान सरकारने ही बंदी कधी आणि कशी लागू करणार याबाबत काही अधिकृत माहिती सांगितलेली नाही. पण क्रिकेटवर बंदी घातली तर आश्चर्य वाटायला नको. अफगाणिस्तान संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध ग्रेट नोएडामध्ये कसोटी क्रिकेट खेळणार होता. पण पाऊस आणि ओल्या मैदानामुळे हा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे हा सामना रद्द करण्याची वेळ आली. हा सामना रद्द झाल्याने न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघाची निराशा झाली. आता तालिबान सरकारच्या निर्णयामुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंचे धाबे दणाणले आहे.

राशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमानसारख्या अफगाणिस्तानच्या अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे. हे खेळाडू जगभरात होणाऱ्या फ्रेंचायझी लीगमधून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. तसेच अफगाणिस्तान क्रिकेटमध्येही गेल्या काही वर्षात सकारात्मक बदल दिसले आहेत. दुसरीकडे, देशातील स्थिती पाहता तालिबानचा फतवा कोणीही रोखू शकत नाही, हे देखील तितकंच खरं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.