मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जातंय; योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल
Marathi September 16, 2024 01:25 AM

संजय राऊत: छत्रपती संभाजीनगर: राज्य सरकारची लाडकी बहीण योजना यंदाच्या निवडणूक प्रचारातील मोठा मुद्दा ठरणार असल्याचे दिसून येते. कारण, निवडणूक घोषणेपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाती नेत्यांच्या सभा आणि दौऱ्यांमध्ये लाडक बहीण योजनेवरुन कौतुक व टीका होत असताना दिसून येते. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून लाडकी बहीण योजनेचं (Ladki bahin yojana) भरभरुन कौतुक केलं जात असून महिला भगिंनींकडून राखी बांधत, औक्षण करत कार्यक्रम घेतले जात आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजना ही निवडणुकांच्या तोंडावर सरारने आमिष दाखवल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दोनच दिवसांपूर्वी आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट करणार असल्याचं म्हटलं होतं. आता, या योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मतांसाठी 1500 रुपयांत बहि‍णींना विकत घेतलं जात आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

वैजापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कितीही आले न गेले संपले, वैजापूरचा एक गद्दार गेला त्याचा काय करायचे. वैजापूरला लागलेला कलंक संपवायचा आहे. आता आम्ही वाट पाहतोय विधानसभा निवडणुक कधी येते, या 40 गद्दारांना कसे गाडतो याची तयारी होतांना दिसत आहे, श्रद्धा आणि सबुरी आता संपली, असे म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून 1500 रुपयांत बहिणीला मतांसाठी विकत घेतले जात आहे. पण, राज्यातील 11 कोटी जनतेचा लाडका मुलगा, चेहरा उद्धव ठाकरे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, उद्धव ठाकरे यांना जो प्रतिसाद मिळत आहे, त्यानुसार या राज्याचे सूत्र पुन्हा एकदा शिवसेनेकडे येणार आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे, पण सरकार बांधावर आलं नाही. मराठ्यांचा सुपुत्र असलेले कृषिमंत्री पायाला माती लागेल म्हणून पाहणी करण्यासाठी खाली उतरले नाहीत, असे म्हणत राऊत यांनी पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावरुन धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 18 कोटींचा पुतळा केवळ 12 लाख रुपयांत उभा करण्यात आला. त्यामुळेच, वाऱ्याच्या झुळकीनं हा पुतळा पडला, पुतळ्याच्या कामाता भ्रष्टाचार करणारं हे  सरकार आहे. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे रक्षण हे करू शकले नाहीत, त्यामुळे या राज्याचे सत्ता पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेकडे दिली पाहिजे. आम्ही पुन्हा येवू कारण  वैजापूर मध्ये आमचा आमदार निवडून येणार आहे, असे म्हणत वैजापूर येथील शिवसेनेच्या मेळाव्यात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली.

लाडक्या बहि‍णींचा भाऊ कोण? – उद्धव ठाकरे

त्यांनी लाडकी बहिणी योजना आणली, पण भाऊ कोण ते  सांगा ना. सगळेच म्हणतात मी तुझा भाऊ, मी तुझा भाऊ… असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन तिन्ही पक्षातील श्रेयवादाच्या लढाईवरुन हल्लाबोल केला. तसेच, यांच्याकडे सगळ्या योजनेला द्यायला पैसे आहेत, पण शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत, असेही ठाकरेंनी म्हटले.

माझ्या मनात ती खंत – ठाकरे

माझ्या मनात रुक रुक आहे की, संभाजीनगरमध्ये लोकसभेला आपला उमेदवार पडला. पण, गद्दाराने आपल्याला पाडावे ही खंत वाटते. आज माझं त्यांना आव्हान आहे, येऊ दे विधानसभा तुमच्या ढुंगणाला चूड लावल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.