‘गौतमने ड्रायव्हरची कॉलर पकडली..’ ट्रकवाल्यासोबत गंभीरचं का झालं होतं भांडण?
GH News September 16, 2024 07:12 PM

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी मालिकेला सामोरं जाणार आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. असं असताना गौतम गंभीर संदर्भातील एक किस्सा सध्या खूपच चर्चेत आहेत. गौतम गंभीरचा मैदानातील आक्रमक स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. पण मैदानाबाहेरही गौतम गंभीरने आपला आक्रमक पवित्रा दाखवला आहे. दिल्ली क्रिकेट संघ आणि टीम इंडियात त्याच्यासोबत खेळलेल्या माजी फलंदाज आकाश चोप्राने हा किस्सा सांगितला आहे. एकदा गौतम गंभीरच्या तळपायची आग मस्तकात गेली होती आणि त्याने ट्रक ड्रायव्हरची कॉलर पकडली होती. राज शमानी पॉडकास्टमध्ये आकाश चोप्राने गंभीरच्या आक्रमतेचा हा किस्सा सांगितला. ‘गौतम गंभीर अनेकदा दिल्लीत एका ट्रक ड्रायव्हरसोबत भांडण केल्याचं सांगतो. गंभीरने असं यासाठी केलं होतं की ट्रक ड्रायव्हरने त्याला ओव्हरटेक केलं होतं आणि शिवी घातली होती. त्यानंतर गंभीरने पुढे जाऊन ट्रक थांबवला आणि ट्रकवर चढून ड्रायव्हरची कॉलर पकडली होती.’

आकाश चोप्राने गौतम गंभीरची स्तुती करताना सांगितलं की, त्याच्या याच शैलीमुळे तो एक चांगला खेळाडू आणि तसेच एक चांगला व्यक्ती बनला. दुसरीकडे, दिल्ली संघात स्थान मिळवण्यासाठी आकाश चोप्रा आणि गौतम गंभीर यांच्यात स्पर्धा राहिली आहे. दोघानीही संघात ओपनिंगसाठी दावा ठोकला होता. त्यामुळे दोघांमध्ये दोस्ती कमी आणि स्पर्धाच जास्त होती. आकाश चोप्राने सांगितलं की, गंभीर एका चांगल्या आणि श्रीमंत कुटुंबातून आहे. पण असं असून त्याने खेळाप्रती आपलं प्रेम कायम ठेवलं आणि दिवसभर मैदानात कठोर मेहनत घेतली.

गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली नुकताच श्रीलंका दौरा पार पडला. यात टी20 मध्ये भारताने श्रीलंकेला 3-0 ने पराभूत केलं. तर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने मात खावी लागली. आता बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील कामगिरीवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम फेरीचं गणित असणार आहे. जर बांगलादेशला व्हाईट वॉश देण्यात यश मिळवलं तर पुढची वाट आणखी सोपी होईल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.