अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? ‘या’पैकी एका जागेवर निवडणूक लढवण्याची शक्यता
GH News September 16, 2024 09:11 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची राजगडवर बैठक झाली. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्या बैठकीत अमित ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. अमित ठाकरे हे माहीम, भांडूप किंवा मागाठाणे यापैकी एका जागेवरून विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमित ठाकरे यांच्याकडून स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून सर्वच नेत्यांनीही विधानसभा निवडणूक लढवावी, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. तर राज ठाकरे यांनी आतापर्यंत पक्षाचे तीन उमेदवार जाहीर केले असून यामध्ये बाळा नांदगावकर (शिवडी), दिलीप धोत्रे (पंढरपूर), राजू उंबरकर (लातूर ग्रामीण-विदर्भ) यांचा समावेश आहे. एकूण २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता मनसेचे आणखी कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.