भारताने इराणच्या प्रमुखांना झापलं, म्हणाला आधी स्वत:मध्ये डोकावून पाहा
GH News September 17, 2024 03:05 AM

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी केलेल्या विधानावर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर इराणला भारताने उत्तर देखील दिले आहे. इराणने इतरांकडे बोटे दाखवण्याआधी स्वत:मध्ये डोकावले पाहिजे, असा स्पष्ट शब्दात भारताने उत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या विधानात म्हटले आहे की, “आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील अल्पसंख्यांकांबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा तीव्र निषेध करतो. त्यांचं हे विधान चुकीच्या माहितीवर आधारित आहेत आणि ते अस्वीकार्य आहे.” इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांनी ईद मिलाद-उन-नबी निमित्त ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “म्यानमार, गाझा, भारत किंवा इतर कोठेही मुस्लिमांच्या चेहऱ्यावरील दुःखाबद्दल आपण गाफील राहिलो तर आपण स्वतःचा विचार करू न करता मुस्लिमांचा विचार करावा ही गरज आहे.”

मुस्लिमांनी एकत्र येण्याची गरज

भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचं खामेनी यांनी म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी सोमवारी हे वक्तव्य केले आणि जगभरातील मुस्लिमांमध्ये एकतेची गरज व्यक्त केली. मोठी गोष्ट म्हणजे खमेनी यांनी भारताची तुलना गाझा आणि म्यानमारशी केली आहे आणि सगळ्यांना एका ओळीत ठेवले आहे. सुन्नी मुस्लीम आणि वांशिक अल्पसंख्याकांच्या दडपशाहीसाठी त्यांचा देश जगभरात कुप्रसिद्ध असताना आणि सतत आंतरराष्ट्रीय टीकेला सामोरे जात असताना खमेनी यांनी ही टिप्पणी केली.

याआधीही केले होते वक्तव्य

इराणच्या सर्वोच्च नेत्याने भारतातील मुस्लिमांबद्दल भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतरही त्यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती आणि काश्मीरमधील मुस्लिमांची स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले होते. तेव्हा खामेनी म्हणाले होते की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये उचललेल्या या पाऊलामुळे मुस्लिमांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.