महिला व्यावसायिकांचे 'आई'कडे दुर्लक्ष
esakal September 19, 2024 10:45 PM

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १९ : राज्य सरकारचे महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. यामध्ये ‘आई’ ही विशेष योजना जाहीर करून त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला; मात्र कोकण विभागातून योजनेसाठी फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. वास्तविक कोकणातील कुटुंबात घरातील आर्थिक सूत्रे महिलांच्या हातात असतात. पुरुष मंडळी शेती, मासेमारी करायची आणि त्याची विक्री महिलांनी करायची, अशी पद्धत आहे. त्याचप्रमाणे किनारपट्टीलगतच्या गावांत खानावळ, न्याहारी-निवास यांसारखे पर्यटनाशी संबंधित व्यवसायही विकसित होत आहेत. कोकणात ‘आई’साठी खूप चांगली संधी असतानाही योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात न आल्याने अनेक जण अनभिज्ञ आहेत.
राज्य सरकारच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी ‘आई’ या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन संचालनालयाकडे संबंधित व्यवसाय नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.
महिला उद्योजकता विकास, पायाभूत सुविधा, पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, महिला पर्यटकांसाठी तयार केलेली खास उत्पादने वा सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही ‘आई’ योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री आहे. योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयीकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोचली नसल्याची बाब समोर आली आहे. या योजनेची माहिती बॅंकांनाही पोहोचलेली नाही. योजनेचे अर्ज कसे आणि कुठे भरायचे, याबाबत महिलांमध्ये अनभिज्ञता आहे.

व्यवसायाची मालकी महिलेकडे हवी
हॉटेल, रेस्टॉरंटची मालकी महिलांची असावी, ही प्रमुख अट ‘आई’ योजनेची आहे. याशिवाय त्या व्यवसायातील ५० टक्के व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे. तसेच पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या मिळवणे अपेक्षित आहे.

योजनेतील महत्त्वाचे मुद्दे
- पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले ४१ प्रकारचे व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज
- १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालय भरणार
- व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा
- टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक
- अर्जदारांनी पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in ऑनलाइन अर्ज करावे.

कोकणातील महिला उद्योजकांसाठी ‘आई’ ही योजना खूप चांगली आहे. ज्या महिलांना नव्याने व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा असलेला व्यवसाय वाढवायचा आहे, त्यांना १५ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रस्ताव सादर करताना व्याजाची हमी घेऊन बॅंकेला दिलेली व्याजाची रक्कम ही पर्यटन संचालनालय देईल. या योजनेची जनजागृती केली जात आहे.
- हनुमंत हेडे, उपसंचालक, पर्यटन संचालनालय, कोकण विभाग

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.