स्पेशल रिपोर्ट : 2019 नुसार भाजपला 164 जागा, मग अजित दादा आणि शिंदेंना किती?
GH News September 20, 2024 01:07 AM

महायुतीत जागा वाटपावरुन नागपुरात महायुतीचे तिन्ही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा झालीय. 15 ते 20 दिवसांत निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सप्टेबरच्या अखेरीस जागा वाटप पूर्ण करुन 50 उमेदवारांची पहिली यादी, पितृपक्ष संपल्यावर जारी करण्याचं लक्ष्य भाजपनं ठेवल्याची माहिती आहे. TV9ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2019च्या विधानसभा निवडणुकीत जेवढ्या जागा भाजपने लढल्या तेवढ्याच जागा भाजप लढणार आहे. 2019 मध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र होते. त्यावेळी युतीत भाजपने मित्रपक्षांसह 164 जागा लढल्या होत्या. तर शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या होत्या. आता पुन्हा 2024मध्ये 160 किंवा 164च्याच आसपास भाजप लढणार असल्याची माहिती आहे.

आता जर महायुतीत भाजप 160च्यावर लढली तर मग शिंदे आणि अजित पवारांना किती जागा मिळणार? याबाबतही माहिती समोर आली आहे. भाजपने 160 किंवा 164 लढल्यास, मित्रपक्षांना भाजप आपल्या कोट्यातून जागा सोडणार. अशा परिस्थितीत 164 जागांच्या हिशेबानं, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी 124 जागा शिल्लक राहतात. लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार विचार केला तर शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांपेक्षा किमान 10 जागा अधिक मिळू शकतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला 72 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागा मिळू शकतात,

भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे. भाजपच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. पण, आता 100 जागांसाठी आग्रही असलेली शिंदेंची शिवसेना आणि 80-90 जागांची मागणी करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कशाप्रकारे समाधान होतंय, हेही दिसेल.

शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक

दरम्यान, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात गुरुवारी रात्री उशिरा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे. या बैठकीत पेच असणाऱ्या जागांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नुकतंच अजित पवार यांनी मुंबईत देवगिरी बंगल्यावर त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत अजित पवारांनी आपल्या आमदारांना महायुतीत निवडणूक लढवायची असल्यामुळे सामंजस्याने वागण्याची सूचना आपल्या आमदारांना दिली होती. तसेच महायुतीच्या इतर घटक पक्षांकडून आपापल्या पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. दरम्यान, महायुतीच्या प्रमुख नेत्यांची जागावाटपाबाबत चर्चा झाल्यानंतर अंतिम फॉर्म्युला हा दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींसमोर ठरणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.