Goa Today's News Live: रिक्षामागे बांधून वासराला फरपटत नेले; चालकावर गुन्हा
dainikgomantak September 20, 2024 09:45 AM
रिक्षामागे बांधून वासराला फरपटत नेले; चालकावर गुन्हा

कोलवा येथे गाईच्या वासराला रिक्षाला बांधून फरपटत नेणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा नोंदवल्याची माहिती कोलवा पोलिसांनी दिली. यासंबंधीचा व्हिडिओ एका वृत्तवाहिनीवर प्रसारित केला होता. चालकाने गाईच्या वासराला दोरीने रिक्षामागे बांधून फरपटत नेल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला. त्यावर लोकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. अशा नराधमावर पशु क्रूरता कायद्यानुसार कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी लोकांनी केली आहे.

माडेल-मडगाव येथे घरफोडी, १ लाख रुपयांचा ऐवज लंपास

माडेल येथे आज वॉल्टर रिबेलो यांच्या घरात अज्ञात चोरट्यानी प्रवेश करून १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार फातोर्डा पोलीस स्थानकावर नोंद करण्यात आली.

या प्रकरणी तपास चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही चोरी नेमकी कशी झाली त्याचा कुठलाही तपशील पोलिसांकडून मिळू शकला नाही.

भूतानी प्रकल्प वाद; TCP मंत्र्यांना पत्र लिहा, सरदेसाईंचा सल्ला

भूतानी प्रकल्पासंदर्भात सांकवाळ येथील दोन कुटुंबांसह कुठ्ठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी बुधवारी विजय सरदेसाई यांची त्यांच्या फातोर्डा येथील कार्यालयात भेट घेऊन आपल्या मालकीच्या जमिनीवर हा प्रकल्प उभा राहात असल्याचा दावा केला. संबंधित कुटुंबीयांनी मुख्य नगरनियोजकांना पत्र लिहिले आहे.

नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनाही त्यांनी पत्र लिहावे, असा सल्ला विजय यांनी दिला. ही बाब जर खरी असेल तर या प्रकल्पाला मान्यता मिळालीच कशी, असा खडा प्रश्न फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ओडिशाच्या एकास अटक, 9 किलो गांजा जप्त

कुडचडे पोलिसांनी ओडिशा येथून अक्षय कुमार बिस्वाल याला (वय ३८) अटक केली. त्याच्याकडून सुमारे ९ किलो गांजा जप्त केला आहे. कुडचडे पोलिस बिस्वाल यांच्या मागावर होते. बिस्वाल हा आपल्या खास माणसांकडून गांजाचा पुरवठा गोव्यात करीत होता.

बिस्वाल याला भद्रक जिल्ह्यातून अटक करण्यात कुडचडे पोलिसांना यश आले. त्याच्याविरोधात कुडचडे पोलिसांनी पीएस क्र. ४९/२०२४ एनडीपीएस कायदा १९८५ च्या २० (ब) (ii) (बी) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. त्याला केपे न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गावच्या गणपती दर्शनासाठी गेला अन् चोरट्यांनी घरात डल्ला मारला; ४५ मिनिटांत ६ लाखांचा ऐवज लंपास

फाळवाडा-कुडणे येथे एका घरातील मंडळी केवळ ४५ मिनिटांसाठी गणेश चतुर्थीनिमित्त मूळ घरी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून सुमारे सहा लाखांचे सोन्याचे दागिने, किमती वस्तू व इतर साहित्य लांबविले. याप्रकरणी घरमालक किशोर गुरूदास मळीक यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.

१३ सप्टेंबर दुपारी ११.५५ ते १२.३३ या वेळेत घर बंद करून गावातील गणपतीसाठी गेलेला इसम घरी परत आला असता त्याला मुख्य दरवाजाची कडी तोडल्याचे दिसले.

Anmod Ghat: अवजड वाहनांना अनमोड घाट खुला

अनमोड घाटामधील रस्ता अवजड वाहनांसाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंद होता. तो आजपासून खुला करण्याचा आदेश कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. अखिल गोवा लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत च्यारी म्हणाले, कारवार उपजिल्हाधिकारी कार्यालयाने रामनगर-गोवा राष्ट्रीय महामार्ग पावसाळा संपेपर्यंत सहाचाकी आणि अवजड वाहनांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता. त्यानुसार हा रस्ता अवजड वाहनांसाठी बंद होता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.