IND vs BAN : बुमराहचा ‘चौकार’, बांगलादेशचं 149 वर पॅकअप, टीम इंडियाला 227 धावांची आघाडी
GH News September 20, 2024 06:13 PM

टीम इंडियाच्या धारदार गोलंदाजांसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात गुडघे टेकले आहेत. टीम इंडियाने पहिल्या डावात 91.2 ओव्हरमध्ये 376 धावा केल्या. बांगलादेशला या प्रत्युत्तरात 150 पारही मजल मारता आली नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर एकालाही टीकता आलं नाही. टीम इंडियाने बांगलादेशला अवघ्या काही तासांमध्ये 47.1 ओव्हरमध्ये 149 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली आहे.

बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने सर्वाधिक धावा केल्या. शाकिबने 64 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या. तर मेहदी हसन मिराज याने 27, लिटन दासने 22 आणि नजमूल हुसैन शांतोने 20 धावांचं योगदान दिलं. अखेरीस तास्किन अहमद आणि नाहिद राणा या दोघांनी प्रत्येकी 11 धावा जोडल्या. हसन महमूद 9, शादमन इस्लाम 2 आणि झाकीह हसन याने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोमिनुल हक याला भोपळाही फोडता आला नाही. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 11 ओव्हरमध्ये 4.55 च्या इकॉनॉमीने 50 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. बुमराहने या दरम्यान 1 मेडन ओव्हर टाकली.

तर मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवत बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम केला. तर लोकल बॉय आर अश्विन याला एकही विकेट मिळाली नाही. दरम्यान आता टीम इंडिया 227 धावांच्या आघाडीसह दुसऱ्या डावात बांगलादेशला काय आव्हान देणार याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

बांगलादेशला गुंडाळलं

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.