महायुतीच्या जागा वाटपात रामदास आठवले यांची उडी, किती जागा हव्यात? मंत्रिपदावरही दावा
GH News September 20, 2024 08:13 PM

महायुतीचं जागा वाटप युद्धपातळीवर सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. जागा वाटप झाल्यानंतर मीडियाला त्याची माहिती दिली जाणार असल्याचं महायुतीचे नेते सांगत आहे. मात्र, सध्या तरी महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्येच जागा वाटप सुरू आहे. मित्र पक्षांचा या जागा वाटपात समावेश करण्यात आलेला नाही. मित्र पक्षांना आपआपल्या कोट्यातून मुख्य पक्ष जागा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. महायुतीच्या जागा वाटपात आता रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी रिपाइंला काही जागा सोडण्याची आणि मंत्रिपदे देण्याची मागणी केली आहे. आठवले यांची ही मागणी मान्य केली जाते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रामदास आठवले आज रत्नागिरीत होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. रामदास आठवले यांनी यावेळी महायुतीकडे जागा मागितल्या आहेत. आम्हाला सोबत घेऊन 2012च्या निवडणुकीपासून महायुतीचा प्रयोग झाला आहे. आता आमच्या पक्षालाही जागा दिल्या पाहिजेत. आम्हाला किमान 10 ते 12 जागा मिळायला पाहिजे. दोन मंत्रिपदे आणि महामंडळे पाहिजे. माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. महाराष्ट्रात महायुतीचे जे खासदार निवडून आले आहेत. त्यात आमचाही खूप मोठा वाटा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.

या मतदारसंघांवर दावा

आम्हाला महायुतीने उमरखेड, धारावी, मालाड, चेंबूर आणि वाशिममधील विधानसभा मतदारसंघ सोडावेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. या मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाची निर्णायक ताकद आहे. आम्हाला हे मतदारसंघ सोडले तर आमचे आमदार विधानसभेत पोहोचतील, असंही त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे नकोच

महायुतीत राज ठाकरे यांना घेऊ नये असं माझं मत आहे, असंही त्यांनी सांगितलं. राज्यात रिपाइंचा मंत्री करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने मंत्रिपद मिळालं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नितेश यांनी बदल करावा

नितेश राणे यांच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. नितेश राणे हे भाजपचे प्रवक्ते आहेत. पण त्यांनी समाजात तेढ निर्माण होईल असं विधान करू नये. मुस्लिम बांधव आपलेच आहेत. कोकणातील मुस्लिम हे कन्व्हर्टेड आहेत. ते आपलेच आहेत. नितेश राणे यांनी आपल्यात बदल करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

उद्धव ठाकरे सोबत राहिले असते तर…

केंद्र सरकारच्या वन नेशन, वन इलेक्शनला आमचा पाठिंबा आहे, असंही त्यांनी जाहीर केलं. मी तीन वेळा मंत्री झालो. चौथ्यांदाही मंत्री होणार आहे. ज्यांना तिकीट मिळत नाही, ते शरद पवार गटात जातात. उद्धव ठाकरे आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबाणही राहिलं असतं, असा दावाही त्यांनी केला.

आरक्षणाचा निर्णय झाला

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे. मराठा आरक्षणाचा विषय केंद्राकडे आला तर आम्हाला विचार करावा लागेल, असंही रामदास आठवले म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.