अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची दिली अनोखी भेट, म्हणाले “तुमच्या स्वप्नातील भारत…”
GH News September 20, 2024 06:13 PM

Ajit Pawar Gift to PM Narendra Modi : पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा आज वर्ध्यात पार पडत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. वर्ध्यातील स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला १५ हजार विश्वकर्मा, ५ हजार IT प्रशिक्षणार्थी, २० हजार महिला बचत गटाच्या महिला सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमात विविध योजनांचे लोकापर्ण केले जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाचे खास गिफ्ट दिलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर आज ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी अजित पवारांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत करत त्यांचे आभार मानले. त्यासोबतच अजित पवारांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाची अनोखी भेटही दिली. तसेच त्यांनी जनतेचेही आभार मानले.

“स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे”

“वर्ध्याच्या पावनभूमीत आज महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ होत आहे. याशिवाय पायाभरणी होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणून मी तुमचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी तुमचे स्वागतही करतो. पंतप्रधानांनी वेळ दिला म्हणून त्यांचेही मनापासून स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला. त्याबद्दल मी महाराष्ट्र जनतेतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि , अशी मी आशा व्यक्त करतो. तसेच पंतप्रधान मोदी व्हिजन आपल्या भारतातील कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे”, असे अजित पवार म्हणाले.

“शेतकरी महिला व इतर घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतूद केली आहे. अमरावती येथे उभारण्यात येणाऱ्या टेक्सटाईल पार्कमुळे खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतील. यामुळे १ लाख रोजगार निर्मिती शक्यता आहे. गेल्या १० वर्षांत पंतप्रधानांनी पायाभरणी केलेल्या कामाचे उद्घाटन त्यांनी केले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नातील कुशल भारत बनवण्यासाठी महाराष्ट्र पूर्णपणे योगदान देईल”, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

रोजगार वाढवता यावा म्हणून वित्त सहाय्य – देवेंद्र फडणवीस

तर दुसरीकडे याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही भाष्य केले. “आजचा दिवस महत्त्वाचा आहे. एकीकडे अमरावती टेक्सटाईल पार्कचे भूमीपूजन, तर दुसरीकडे कौशल्य विकास व स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ होतो आहे. एकूण ६.५ लाख कुटुंबाचे चित्र बदलणार आहे. त्यांच्यापर्यंत रोजगार पोहोचणार आहे. ज्यांना आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांना संधी देत आहोत. इतकी वर्षे झाली सर्व घटकांचा विचार कुठल्याही सरकारने केला नव्हता. एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बारा बलुतेदारांना ज्याप्रमाणे प्रशिक्षण दिले व त्यांना रोजगार वाढवता यावा म्हणून वित्त सहाय्य केले”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हमीभावापेक्षा जास्त दर यंदा मिळेल – देवेंद्र फडणवीस

“टेक्सटाईल पार्कमुळे अमरावतीला जगाच्या नकाशावर आणता येईल. मी, मुख्यमंत्री व नवनीत राणा यांनी पंतप्रधानांना विनंती केली होती. ३ लाख रोजगार निर्माण होतील. परिवर्तन जे पंतप्रधानांनी सुरु केले ते आम्ही महाराष्ट्रात सुरु केले आहे. लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये महिन्याला देत आहोत. लखपती दीदीमधूनही मदत करतोय. कापसाला शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. कच्च्या तेलावर निर्यात वाढवली. आज सोयाबीनला भाव मिळायला सुरुवात झाली. हमीभावापेक्षा जास्त दर यंदा मिळेल”, असेही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.