राहुल गांधींच्या कृतीचा विसर!
Marathi September 20, 2024 08:24 PM

काँग्रेस अध्यक्ष खर्गेंच्या पत्राला भाजप अध्यक्ष नड्डाचे प्रत्युत्तर : राहुल गांधींना कथित धमकीचे प्रकरण

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाने खुले पत्र लिहिले आहे. राहुल गांधी समवेत स्वत:च्या पक्षाच्या नेत्यांची कृत्यं विसरलात किंवा त्याकडे तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याचे नड्डा यांनी खर्गे यांना सुनावले आहे. यापूर्वी खर्गे यांनी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने पत्र लिहिले होते. यात त्यांनी राहुल गांधींसंबंधी वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती.

ज्या व्यक्तीचा इतिहासच देशाच्या पंतप्रधानांसमवेत पूर्ण ओबीसी समुदायाला चोर म्हणून शिवी देण्याचा राहिला आहे, ज्याची मानसिकता पूर्ण देश ओळखून आहे, ज्याने संसदेत देशाच्या पंतप्रधानांना काठीने मारहाण करण्याबद्दल वक्तव्य केले होते. त्या राहुल गांधीला योग्य ठरविण्याचा प्रयत्न तुम्ही कोणत्या हतबलतेपोटी करत आहात अशी विचारणा नड्डा यांनी खर्गे यांना केली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांनी मागील 10 वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना 110 हून अधिक शिव्या दिल्या आहेत. तेव्हा राजकीय शुचिता, मर्यादा, शिस्त, शिष्टाचार यासारखे शब्द तुमच्या शब्दकोशातून गायब का होतात? तुम्ही राजकीय शुचितेचा दाखला देत आहात परंतु काँग्रेसच्या नेत्यांचा इतिहासच याच्या चिंधड्या करत आहे. अशाप्रकारची दुटप्पी भूमिका का असा सवाल भाजप अध्यक्षांनी खर्गे यांना उद्देशून केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख करू लागलो तर त्याकरता एक स्वतंत्र पुस्तक लिहावे लागेल याची जाणीव खर्गे यांना आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा वक्तव्य आणि कृतींचा तुम्हाला कसा विसर पडला अशी विचारणा नड्डानी खर्गे यांना पत्राद्वारे केली आहे.

मॉडच्या व्यापाऱ्याचा शब्द

राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनीच मोदींसाठी ‘मौत का सौदागर’ यसारख्या अत्यंत आक्षेपार्ह अपशब्दांचा वापर केला होता. या वक्तव्याकरता खर्गे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचे गुणगानच केले होते. तेव्हा राजकीय शूचितेचा काँग्रेसला विसर पडला होता का? राहुल गांधींनी जाहीरपणे ‘मोदींची प्रतिमा मलीन करू‘ असे म्हटले होते, तेव्हा राजकीय मर्यादेचा कुणी भंग केला होता? खर्गे यांना स्वत:च्या नित्य निरंतर फेल्ड प्रॉडक्टचा बचाव करणे आणि त्याचे गुणगान करावेच लागेल हे मी समजू शकतो. परंतु कमीत कमी काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी या गोष्टींवर आत्ममंथन करणे अपेक्षित होते असे नड्डा यांनी नमूद केले आहे.

काँग्रेस ‘कॉपी अँड पेस्ट’चा पक्ष

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आता स्वत:च्या युवराजाच्या दबावात ‘कॉपी अँड पेस्ट’चा पक्ष ठरला ही मोठ्या दु:खाची बाब आहे.  काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आईवडिलांबद्दलही अनुद्गार काढले आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासात कुठल्याही लोकनेत्याचा अपमान कधी करण्यात आला नव्हता. परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी देशाच्या पंतप्रधानांचा खालच्या थराला जात अपमान केला असल्याची टीका न•ा यांनी केली आहे.

पाकिस्तानसमर्थक लोकांची साथ

राहुल गांधी हे पाकिस्तान समर्थक अन् भारतविरोधी लोकांचे समर्थन करतात. याचमुळे ते दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्या कार्यक्रमात दिसून येतात. देश तोडू पाहणाऱ्या शक्तींकडून राहुल गांधी हे समर्थन मागतात. तसेच विदेशी शक्तींना देशाच्या लोकशाहीत हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतात. देशात आरक्षण अन् जातीचे राजकारण करून राहुल गांधी हे एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात भडकवत आहेत. याचमुळे विदेशी भूमीवर जात आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार राहुल गांधी मांडत असल्याचा आरोप नड्डा यांनी पत्रात केला आहे.

खर्गेंकडून मोदींना पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 74 व्या जन्मदिनी काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी शुभेच्छा दिल्यावर एक पत्रही लिहिले होते. यात राहुल गांधी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्यांवर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. भाजप आणि त्याच्या घटक पक्षाचे नेते सातत्याने राहुल गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंसक भाषेचा वापर करत आहेत. अशा नेत्यांवर अंकुश आणण्याची विनंती करत असल्याचे खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.