काशी विश्वनाथ मंदिरात मंगला आरती दरम्यान आग
Marathi September 21, 2024 12:24 AM

शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याची माहिती

वृत्तसंस्था/वाराणसी

वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरात गुऊवारी पहाटे शॉर्टसर्किटमुळे आग लागली. मंदिर संकुलातील गर्भगृहाबाहेरील शिखराजवळील खिडकीत शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. मंगला आरती संपल्यानंतर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. आग लागल्याचे समजताच भाविकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला.  अग्निशमन यंत्रांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. आग लागल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून भाविकांसाठीचे दर्शन काही वेळासाठी थांबवले.

श्री काशी विश्वनाथ मंदिरात गर्भगृहाबाहेरील घुमटाजवळील खिडकीत शॉर्टसर्किटने आग लागली. कोणतीही घटना टाळता यावी यासाठी गर्भगृहाभोवती काही काळासाठी भाविकांना बाहेर काढण्यात आले. सध्या या घटनेनंतर मंदिर प्रशासनाकडून मंदिराच्या वायरिंग यंत्रणेची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे मंदिराचे एसडीएम शंभू शरण यांनी सांगितले. आगीची घटना पहाटे 4.55 वाजता घडली. त्यानंतर त्याला तात्काळ नियंत्रणात आणण्यात आले. यात कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. शॉर्टसर्किट कसे झाले याचा तपास सुरू असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.