सोमेश्वर कारखान्याची रंगणार वार्षिक सभा
esakal September 21, 2024 12:45 AM

सोमेश्वरनगर, ता. २० : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची साठावी वार्षिक सर्वसाधारण सभा २६ सप्टेंबरला दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रांगणात पार पडणार आहे. डिस्टिलरी प्रकल्पाच्या विस्तारवाढीसाठी स्वनिधी उभारणे आणि शिक्षणनिधी कपात करणे अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झडणार आहे. याशिवाय गाळप हंगाम नियोजन, अभ्यास दौरे, शिक्षणसंस्था अशा विषयांवरही सभा रंगणार आहे.
लोकशाही पध्दतीने आठ-दहा तास चर्चेव्दारे रंगणारी सभा म्हणून सोमेश्वरच्या वार्षिक सभेचा लौकीक आहे. सन २०२३-१४ या हंगामाच्या वार्षिक सभेपूर्वी संचालक मंडळाने सभासदांना ३५७१ रूपये प्रतिटन इतका स्वतःच्याच इतिहासातील उच्चांकी बाजारभाव देऊन राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट साखर उतारा, साखर विक्री, उत्तम तांत्रिक क्षमता, चांगला ताळेबंद या कारखान्याच्या जमेच्या बाजू आहेत. मागील हंगामाच्या तोडणी नियोजनाचे आणि एकूण ऊस उत्पादनाचे अंदाज चुकल्याने सभासदांमध्ये नाराजी होती. यावर संचालक मंडळाने वार्षिक सभेआधीच लागवडीचे व तोडणीचे नियोजन कसे व्हावे यावर सभासदांचे विशेष चर्चासत्र आयोजित करत आगामी हंगामासाठी अनेक सुधारणा स्वीकारल्या आहेत. त्यामुळे वार्षिक सभेत तोडणीबाबतची चर्चा अन्य विषयांकडे वळण्याचा संभव आहे.

मॉरीशसचा अभ्यासदौरा, काटकसरीवर होणार वादंग
सोमेश्वरने डिस्टिलरी विस्तारवाढीसाठी २०१८-१९ या हंगामात दिलेल्या ठेवीचे नूतनीकरण करणे, विस्तारवाढीसाठी नव्याने ठेव घेणे, तसेच ठेव विमोचन निधी विस्तारवाढीकडे वळविणे असे भविष्यासाठीचे महत्वाचे मुद्दे चर्चेत आहेत. शिक्षणसंस्थेसाठी ऊसबिलातून काही रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव ठेवल्याने शिक्षणसंस्थेतील कारभारावर चर्चा झडणार आहे. तसेच संचालक मंडळाचा मॉरीशसचा अभ्यासदौरा, पैशांची उधळपट्टी व काटकसर अशा विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.